भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेवर (सी.सी.आय.एम.) महाराष्ट्रातून पाच उमेदवार निवडून द्यावयाचे असून त्यासाठी तीन पॅनलचे १५ आणि अपक्ष १० असे एकूण २५ उमेदवार रिंगणात आहेत. रिंगणात असलेल्या वैद्यकीय विकास मंच, धन्वंतरी आणि निमा या तिन्ही संघटना मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असून परिषदेवर कुणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेवर संपूर्ण देशातून ८० उमेदवार निवडून द्यावयाचे असून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या परिषदेवर महाराष्ट्रातील एकूण ८० हजार डॉक्टरांपैकी ५१ हजार ५५१ नोंदणीकृत आयुर्वेद डॉक्टर्स ५ उमेदवारांना निवडून देणार आहे.
या निवडणुकीसाठी तीन पॅनलचे १५ आणि अपक्ष १० असे एकूण २५ उमेदवार रिंगणात आहेत. या तिन्ही पॅनल आणि अपक्ष उमेदवारांनी मतदारांकडे मतपत्रिका पाठवणे सुरू केले आहे. मतदान करून या मतपत्रिका २७ मेपर्यंत मुंबई येथे पाठवणे आवश्यक आहे. २८ आणि २९ मे रोजी मतदान पत्राची पडताळणी होईल. ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीसाठी विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्र, कोकण, आणि खानदेश असे पाच विभाग पाडण्यात आले असून प्रत्येक पॅनलने विभाग प्रमुखांची नियुक्ती केली आहे. हे विभाग प्रमुख मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन व संपर्क साधून आपल्याच उमेदवारांना मतदान करण्याचा आग्रह धरत आहेत. भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेची दर पाच वर्षांनी निवडणूक होते. भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद आयुर्वेदिक डॉक्टरांचे अभ्यासक्रमाचे स्वरुप ठरवणे त्यात बदल करणे, नवीन महाविद्यालयांना परवानगी देणे, नवीन जुन्या महाविद्यालयांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या विकासासाठी धोरण ठरवणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये बदल घडवून आणणे, आदी
कामे करते.
वैद्यकीय विकास मंचतर्फे विदर्भ विभागातून नागपूरचे डॉ. जयंत देवपुजारी, मुंबईतून डॉ. आशानंद सावंत, पुणे विभागातून डॉ. सदानंद सरदेशमुख, पश्चिम महाराष्ट्र विभागातून डॉ. सूर्यकिरण वाघ आणि नाशिक विभागातून डॉ. ज्ञानेश्वर थोरात रिंगणात असल्याची माहिती मंचचे संयोजक डॉ. आशुतोष गुप्ता यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत कार्यरत विविध (स्थायी, अस्थायी व कंत्राटी) बी.ए.एम.एस. आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वैद्यकीय विकास मंचने पुढाकार घेतला आहे.
यामध्ये सामान्य वैद्यकीय अधिकारी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विभिन्न आरोग्य कार्यक्रम व अभियानांतर्गत सेवरत बी.ए.एम.एस. डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्यशासनाकडे वैद्यकीय विकास मंच सतत पाठपुरावा करत आहे. मंचला असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ऑफ महाराष्ट्र, आयुर्वेद व्यासपीठ, आरोग्य भारती, शासन अनुदानित आयुर्वेद महाविद्यालय व्यवस्थापन व प्राचार्य संघटनांचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.