शहराचा चौफेर विस्तार होत असताना मोठमोठय़ा उंच इमारती तयार होत आहे. त्यांनी आणि निवासी संकुलांनी अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याची बाब समोर आली आहे. शहरात अडीच हजारांवर उंच इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचे आढळून आले. अशा इमारतींच्या अग्निसुरक्षा उपाय यंत्रणांची तपासणी केली जात नसल्याचेही निदर्शनास आले आहे.
गेल्या काही वर्षांत शहरातील इमारतींना आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी वर्दळीच्या सीताबर्डी भागात एका इमारतीला आग लागली. मात्र, त्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा नसल्याचे समोर आले. मधल्या काळात अग्निशमन यंत्रणा नसलेल्या अनेक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी अनेकांना नोटीस देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर आजही तीच परिस्थिती कायम आहे.
शहरातील विविध भागात अडीच हजारांवर असलेल्या उंच इमारती राष्ट्रीय इमारत संहिताच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करीत नसल्याची बाब महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या आकडेवारीवरून पुढे आली आहे. त्यामुळे सव्वा लाख नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या उंच इमारतींमध्ये विविध कंपन्यांची कार्यालये, रुग्णालयासह नागरिक राहत आहेत. त्यातील अनेक इमारतींमध्ये राष्ट्रीय इमारत संहितानुसार आग प्रतिबंधक उपाय यंत्रणा नसताना अशा इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. काही इमारतींचे वीज व पाणी बंद करून कारवाई केल्याचा देखावा अग्निशमन विभागाकडून केला जात आहे. मात्र, अनेक सदोष इमारतींकडे केलेले दुर्लक्ष हजारो नागरिकांच्या मुळावर येण्याची चिन्हे आहेत. या उंच इमारतीतील वरच्या माळ्यावर आग लागल्यास बंब उभे करण्यासाठी इमारतीच्या बाजूला अनेकांनी मोकळी जागा सोडली नाही. त्यामुळे अग्निशमन जवानांना जीव धोक्यात घालून पाण्याचा मारा करावा लागतो. अनेक इमारतींमध्ये होसपाईप, स्प्रिंकलर आदी उपकरणे नाही. संकटकालीन मार्ग नाही. पायऱ्यांची रुंदी दीड मीटर असणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी गोकुळपेठ मार्केटजवळील इमारतीमधील अपघातानंतर सर्वेक्षण केले असता अनेक इमारतीच्या पायऱ्या केवळ पाऊन मीटर रुंद असल्याचेही दिसून आले.
शहरात मोठय़ा प्रमाणात इमारती असून गेल्या काही वर्षांत त्यांचे नूतनीकरण करण्यात आले नाही. विशेषत: रामदासपेठ, धंतोली, सक्करदरा, सदर, बैरामजी टाऊन, इतवारी या भागात इमारतींचे नूतनीकरण करून व्यावसायिक प्रतिष्ठाने, रुग्णालये, कार्यालये थाटण्यात आली आहेत. मात्र, या इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा लावण्यात आली नाही. याबाबत अग्निशमन विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पंचवीस वर्षांत इमारत बांधकामासाठी २ हजार ७९० जणांनी अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले. मात्र, यातील केवळ ४३२ जणांनी बांधकाम परिपूर्णतेचे प्रमाणपत्र घेतले. शहरातील २ हजार ३५८ इमारतींमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्याचे विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. मात्र, अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही.
या संदर्भात अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी बी.पी. चंदनखेडे यांनी सांगितले, शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या किंवा जुन्या इमारतींजवळ ना हरकत प्रमाणपत्र नसेल, अशा इमारत मालकांना नोटीस देणे सुरू आहे.
अग्निशमन विभागाकडून सर्वेक्षण सुरू आहेत. काही इमारतींची प्रकरणे न्यायालयात आहे. ज्या इमारत मालकांनी बांधकाम परिपूर्णतेचे प्रमाणपत्र घेतले नाही, अशांना नोटीस दिले जात असल्याचे चंदनखेडे यांनी सांगितले.