‘या, मला आपणाशी बोलायचे आहे’ अशी साद घालत मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३१ मे रोजी सायंकाळी पाच वाजता मुंबईत आयोजित केलेल्या जाहीर सभेस नाशिक जिल्ह्य़ातून २५०० वाहनांमधून सुमारे ३५ हजार कार्यकर्ते रवाना होणार असल्याची माहिती मनसेतर्फे देण्यात आली आहे.या सभेसाठी नाशिकमधून अधिकाधिक संख्येने कार्यकर्त्यांनी जावे यासाठी मनसेच्या वतीने शहरातील चारही विधानसभा मतदारसंघात विभागनिहाय तसेच प्रत्येक तालुक्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. मनसेचे संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर हे दोन दिवसांपासून पक्षाच्या राजगड या मध्यवर्ती कार्यालयातून सूत्र हलवित असून प्रदेश सरचिटणीस आ. वसंत गीते, अतुल चांडक, आ. अ‍ॅड. उत्तमराव ढिकले, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सभेसाठी जाणाऱ्यांचे नियोजन करण्यात येत आहे. सभेसाठी रवाना होणाऱ्या वाहनांवर राज ठाकरे यांचे छायाचित्र लावण्यात येणार आहे.