गणरायाचा अखंड जयघोष, झांजपथक, बेन्जोचा निनाद आणि ढोल-ताशांच्या कडकडाटावर ठेका धरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उत्साहात, टाळ-मृदंगाचे वेगळेपण, श्री मूर्तीची आकर्षक आरास आणि वरुणराजाची उल्हसित करणारी बरसात अशा विविधरंगी भावपूर्ण वातावरणात वस्त्रनगरी इचलकरंजीत गणेशाला अखेरचा निरोप दिला. तब्बल २६ तास चाललेल्या मिरवणुकीत अधूनमधून वरुणराजानेही हजेरी लावली.
मानाच्या बिरदेव गणेशोत्सव मंडळाच्या पालखी पूजनाने विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा पोलीसप्रमुख विजयसिंह जाधव, आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, नगराध्यक्ष सुप्रिया गोंदकर, उपनगराध्यक्ष संजय कांबळे, पोलीस उपअधीक्षक प्रकाश देशमुख, पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार, रामदास इंगवले, राजू तहसीलदार आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. काही मंडळांनी सामाजिक, पौराणिक त्याचबरोबर संदेश फलकांसह मिरवणुका सुरू होत्या. बिरदेव गणेश मंडळाची धनगरी ढोल, ताशा व श्रींची पालखी मिरवत वेगळेपण दर्शविणारी मिरवणूक ठरली. यंदाचा गणेशोत्सव हा डॉल्बीमुक्त झाल्याने या विसर्जन मिरवणुकीत ढोल, ताशा, हलगी व अन्य काही नवी वाद्य्ो या वर्षी इचलकरंजीकरांना पाहावयास मिळाली. डॉल्बीचा दणदणाट शांत झाल्याने इचलकरंजीकरांनी या मिरवणुकीचा आनंद घेतला.
विसर्जन मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षवेधी असाच होता. भगव्या साडय़ा, फेटा परिधान करून महिला मोठय़ा प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. खंजिरेनगर गणेशेत्सव मंडळ, सुदर्शन युवक मंडळाची गणेश मिरवणूक लक्षवेधी ठरली. त्याचबरोबर गांधी कॅम्प, त्रिमूर्ती तसेच रवि क्लासेस, संतूबाई गणेशोत्सव मंडळ, ओमसाई, कलानगर, व्यंकटेश, भाग्यश्री कॉलनी गणेशोत्सव मंडळ, कबनूरचा मानाचा गणेश, श्रीमंत गणेश आदी मंडळांच्या गणेश मिरवणुकीतही महिलांचा मोठा सहभाग होता. बऱ्याच मंडळांच्या महिलांनी मिरवणुकीत झिम्मा-फुगडीचा फेर धरला होता. रवि क्लासेसच्या कार्यकर्त्यांनी सर्वधर्मसमभाव मिरवणूक काढली.
विसर्जन मिरवणूक मार्गावर मंडळांचे स्वागत करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थ, मुस्लिम वेल्फेअर फाऊंडेशन, भारतीय जनता पार्टी, क्रेडाई, मारवाडी युवा मंच व बिल्डर्स असोसिएशनचा संयुक्त कक्ष, िहदू एकता, शिवशाही सांस्कृतिक मंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी, जनसुराज्य, जय शिवराय तरुण मंडळ, पोलिस दक्षता समिती, मराठा विद्यार्थी संघटना, इचलकरंजी फेस्टिव्हल व अन्य स्वागत कक्षही उभारण्यात आले होते. राजर्षी शाहू पुतळा, शिवाजी पुतळा, जनता चौक, गांधी पुतळा, नारामण चित्रमंदिर, झेंडा चौक, गांवभाग नदीनाका ते पंचगंगा घाटमार्गावर विसर्जन मार्गावर नागरिकांची दुतर्फा गर्दी होती.
विसर्जनादररम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीने जीवरक्षक यंत्रणा उभारली असून, यांत्रिक नावेच्या मदतीने पट्टीचे पोहणारे कार्यकत्रे तनात केले होते. तसेच अग्निशमन दलाचे तसेच जीवन मुक्ती संघटनेचे जवान तनात आहेत. मोठय़ा गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नातून मोठय़ा क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.