चोरी, अपहरण, खून, बलात्कार अशा भयावह घटनांमुळे रात्रीची मुंबई बदनामच फार. पण या अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये आजही सचोटी आणि प्रामाणिकपणाची हलकीशी तिरीप अधूनमधून झळकून जाते. अशा या मुंबईच्या उजळ बाजूचा अनुभव नुकताच कामानिमित्त या महानगरीत येऊन गेलेल्या यासिन पटेलनामक एका पाटण्याच्या पाहुण्याला आला. या पाहुण्याने आपला हा अनुभव फेसबुकवर ‘शेअर’ केला. या अनुभवावर एक हजार प्रतिक्रिया तर तब्बल २६ हजार ‘लाइक्स’ देत ‘नेट’करांनी या प्रामाणिकपणाला सलाम केला.
पटेल यांच्या गोष्टीचा हिरो आहे प्रदीप आनंदराव दळवी हा साताऱ्याचा २९ वर्षांचा तरुण. प्रदीप मुंबईतीलच एका हॉटेलात वाहनचालक म्हणून काम करतो. एके रात्री मुंबईच्या आंतरदेशीय विमानतळाबाहेर पटेल यांच्याशी प्रदीपची गाठ पडली. त्या रात्री काही कामानिमित्त पाटण्याहून आलेल्या पटेल यांना विमानतळाबाहेरून ठाणे येथे जाण्यास टॅक्सीच मिळत नव्हती. पटेल यांची हवालदिल परिस्थिती पाहून प्रदीपने त्यांना ठाण्याला सोडण्याची तयारी दाखविली. त्या रात्री प्रदीपने पटेल यांना ठाण्याला सोडले. त्यासाठी पटेल यांनी देऊ केलेले पैसेही त्याने नाकारले. पण, नेमकी पटेल यांची लॅपटॉप आणि काही महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग प्रदीपच्या गाडीत राहिली होती.
हॉटेलमध्ये आल्यानंतर पटेल यांना आपली चूक लक्षात आली. पण, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. हताश मनस्थितीत असतानाच तासाभरात त्यांचा फोन वाजला. हा फोन प्रदीपचा होता. घणसोलीच्या आपल्या घरी परतल्यानंतर पटेल यांचा लॅपटॉप आपल्या गाडीतच राहिल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याच रात्री घणसोलीहून ठाण्याला येऊन पटेल यांचे सामान परत करण्याची तयारी प्रदीपने दाखविली. परंतु, त्याच्या चांगुलपणाचा फायदा तरी किती घ्यायचा असा विचार करून पटेल यांनी त्याला, मी स्वत:च घणसोलीला येऊन आपले सामान घेतो, म्हणून सांगितले.
ती रात्र प्रदीपला, आपला फोन नंबर कसा मिळाला या विचारात पटेल यांनी काढली. प्रदीपकडूनच त्यांना कळले ते असे.. सामान परत करण्यासाठी प्रदीपने पटेल यांची लॅपटॉपची बॅग धुंडाळली. तेव्हा त्याला पाटण्याच्या हॉटेलची बिले सापडली. प्रदीपने या बिलावरील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला. तेथील कर्मचाऱ्याने पटेल यांचे नाव सांगितले. मात्र त्यांचा दूरध्वनी क्रमांक देण्यास नकार दिला. पुन्हा एकदा पटेल यांची बॅग तपासली असता त्यात त्यांची ‘व्हिजिटिंग कार्डे’ सापडली. त्यावर त्यांचा सेलफोन क्रमांक असल्याने प्रदीपचे काम सोपे झाले.
बारावीपर्यंतचे शिक्षण झालेल्या आणि चांगला धावपटू असलेल्या प्रदीपविषयी आलेला हा अनुभव पटेल यांनी आपल्या फेसबुकवर लिहिला. आश्चर्य म्हणजे काही दिवसातच त्यावर तब्बल २६ हजार प्रतिक्रिया उमटल्या, तर हजारेक जणांनी त्याला ‘लाईक’ केले. स्वत: प्रदीप कुठल्याही सोशलनेटवर्किंग माध्यमावर नाही. परंतु, आपल्या मित्राच्या मदतीने आपल्या प्रामाणिकपणाची प्रशंसा करणाऱ्या प्रतिक्रिया वाचल्या आणि त्याचे मन भरून आले. ‘ही गोष्ट जेव्हा माझ्या साताऱ्याला राहणाऱ्या वडिलांना सांगितली, तेव्हा त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. बाबा गावात सर्वाना ही गोष्ट मोठय़ा अभिमानाने सांगत आहेत,’ असे प्रदीप सांगतो.