पावसाळा अंतिम टप्प्यात आला असताना सोलापूर जिल्ह्यात अद्यापि पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत असून सध्या जिल्ह्यातील २४० गावे व १४०६ वाडय़ा-वस्त्यांवरील चार लाख ८८ हजार ४०७ बाधित लोकसंख्येसाठी २६१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टँकर मंगळवेढा व सांगोला भागात असल्याचे दिसून येते.
मागील सलग दोन वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट आहे. गेल्या उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात पाणीपुरवठय़ासाठी टँकरची संख्या सातशेपर्यंत गेली होती. परंतु सुदैवाने पावसाळ्यात पावसाने पहिल्या महिना-दीड महिन्यात कृपा केल्याने पाणी प्रश्नाची तीव्रता कमी झाली. त्यातच मागील दोन वष्रे योग्य नियोजनाअभावी उजनी धरणातील पाण्याचा साठा संपुष्टात आला असताना यंदाच्या वर्षी या धरणात पुरेसा पाणीसाठा जमा झाला. तथापि, जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत तर रब्बी पिकांच्या पेरण्यांचा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
जिल्ह्यात अद्यापि २६१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. यात सांगोला तालुक्यातील ६५ गावे व ४९७ वाडय़ा-वस्त्यांना ७० टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मंगळवेढा तालुक्यात ५६ गावे व ४०५ वाडय़ा-वस्त्यांची तहान भागविण्यासाठी ७८ टँकर कार्यरत आहेत. याशिवाय माढा (३५), करमाळा (३३), माळशिरस (१८), मोहोळ (७), दक्षिण सोलापूर व पंढरपूर (प्रत्येकी ६), अक्कलकोट (५), बार्शी (२) आणि उत्तर सोलापूर (१) याप्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर धावत आहेत. जिल्ह्यात पाणी प्रश्नावर १६७ खासगी विहिरी व िवधन विहिरींचे जिल्हा प्रशासनाने अधिग्रहण केले आहे.
जिल्ह्यात सुरुवातीला वरुणराजाने कृपा केल्यामुळे यंदा खरीप हंगामात मोठय़ा प्रमाणात पीक लागवड करण्यात आली होती. परंतु मागील महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके धोक्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५७.०२ टक्के एवढाच पाऊस झाला आहे. १ जूनपासून ते आजतागायत ३२५.५३ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र २७८ मिमी एवढाच पाऊस झाला. मंगळवेढा (३८.३५ टक्के) व सांगोला (४२.४२ टक्के) येथील पावसाचे प्रमाण जेमतेम असल्यामुळे या दोन्ही तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती कायम असल्याचे दिसून येते.