15 December 2017

News Flash

एकाच वेळी २७ नवीन मराठी संकेतस्थळांचा खजिना!

संगणक आणि भ्रमणध्वनीच्या युगात माहिती-तंत्रज्ञान विषयाचा स्फोट झाला असून घरबसल्या केवळ एका क्लिकवर जगातील

प्रतिनिधी, मुंबई | Updated: March 2, 2013 12:40 PM

संगणक आणि भ्रमणध्वनीच्या युगात माहिती-तंत्रज्ञान विषयाचा स्फोट झाला असून घरबसल्या केवळ एका क्लिकवर जगातील सर्व माहिती आपल्यासमोर येऊ लागली आहे. इंग्रजी भाषेत वेगवेगळ्या विषयांवरील अनेक संकेतस्थळे असताना त्या तुलनेत मराठीत वेगवेगळ्या विषयांवरील माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे प्रमाण खूप कमी आहे. मात्र ही कसर आता भरून निघाली असून वेगवेगळ्या विषयांवरील २७ नवीन मराठी संकेतस्थळांचाखजिना बुधवारपासून मराठी रसिकांसाठी खुला झाला आहे.
सचिन पिळणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संकेतस्थळांची निर्मिती केली आहे. काही अपवाद वगळता वेगवेगळ्या विषयांवर मराठीतून माहिती देणारी संकेतस्थळे फारशी नाहीत. जी आहेत ती संस्था, मंडळे, कार्यालये यांची आहेत. मराठी भाषेत सुमारे पाच हजार संकेतस्थळे वेगवेगळ्या विषयांवर तयार करता येऊ शकतात. आम्ही आमच्या परीने खारीचा वाटा या २७ संकेतस्थळांच्या निमित्ताने उचलला आहे, असे पिळणकर म्हणाले. माहिती, ज्ञान आणि प्रबोधन हे तीनही एकाच वेळी संकेतस्थळांच्या माध्यमातून होऊ शकते. तसेच मराठी माणसाला आपल्या मातृभाषेत विविध विषयांवरील माहिती एका क्लिकवर मिळवून देणे हा ही उद्देश या मागे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.     
अपवाद सोडला तर भ्रमणध्वनी विषयाबाबत माहिती देणारे मराठी भाषेत संकेतस्थळ नाही. इंग्रजी भाषेत मात्र या विषयावरील भरपूर संकेतस्थळे पाहायला मिळतात. त्यामुळे मराठी माणसांसाठी खास www.mobilemajha.com  हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. विविध कंपन्यांच्या भ्रमणध्वनी विषयीची माहिती येथे मिळू शकेल. रांगोळी आणि मेंदी हे महिलांच्या जिव्हाळ्याचे विषय. या विषयावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. आता www.bharatiyakala.com  या संकेतस्थळाच्या माध्यमातून निरनिराळ्या भागातील भारतीय रांगोळ्या आणि मेंदी येथे  पाहायला मिळतील.
www.kutuhal.com   या संकेतस्थळावर पृथ्वीवरील विविध रहस्यांचा आढावा घेण्यात आला आहे. आपल्याला गूढ गोष्टींचे कुतूहल असते. पृथ्वीवरील अनेक गोष्टींचा माणसाला अद्याप उलगडा झालेला नाही. अशा काही गोष्टींची माहिती यात देण्यात आली आहे. www.hahahihihuhu.com या संकेतस्थळावर ‘विनोद’ संकलित केले आहेत. मराठीत अशा प्रकारचे हे पहिलेच संकेतस्थळ असावे. मुंबई शहर आणि उहनगरातील महत्वाची ठिकाणे, तेथे कसे जायचे, काय पाहायचे याची माहिती आणि छायाचित्रे www.mumbainagari.in येथे वाचता येईल.
नवोदित कवींसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून ‘प्रेमरंग’ या नावाचे संकेतस्थळ असून लघुउद्योग, अन्य व्यवसाय, बचतगट याची माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. ‘बिझनेस माझा’ या संकेतस्थळावर मराठी उद्योजकांनी व्यवसाय कसा करावा आणि वाढवावा याची माहिती मिळेल. त्याखेरीज मराठी भाषा, योगसाधना, सचिन तेंडुलकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, नाशिक, वरळी, ताडदेव, मलबार हिल, वसई दर्शन या परिसरातील महत्वाची माहिती, स्थळे, दूरध्वनी क्रमांक असलेली संकेतस्थळे आहेत. महाराष्ट्रातील ‘अष्टविनायक’ दर्शन, महाराष्ट्राची संस्कृती, भूगोल याची माहिती, महाराष्ट्रातील संत, कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग, भारतीय दंड विधान,  महाराष्ट्र पोलीस प्रशासन आदी विषयांवरही संकेतस्थळे सुरू झाली आहेत. या सर्व संकेतस्थळांचे पत्ता www.27marathi.com येथे एकत्रित मिळू शकतील.

First Published on March 2, 2013 12:40 pm

Web Title: 27 new marathi web site at a time
टॅग Marathi,Web Site