‘पीपल फॉर अॅनिमल’ आणि ‘अहिंसा संघा’ने कारवाई करीत फुले मंडईमधून रोझ किंग प्रकारचे २७ पोपट, तसेच विविध जातींच्या देशी-विदेशी ५९ कासवांची मुक्तता केली, मात्र यापैकी एका कासवाचा मृत्यू झाला.
काही व्यापारी पोपट आणि कासवांची तस्करी करीत असल्याची माहिती पीपल फॉर अॅनिमल आणि अहिंसा संघाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्याआधारे त्यांनी व्यापाऱ्यांच्या दुकानावर छापा घातला. प्लास्टिक आणि चामडय़ाच्या पिशव्यांत ठेवलेली दुर्मीळ भारतीय ५१, मलेशियन ३, लेदर बैक २ आणि किल्ड बैक ३ अशी ५९ कासवे आढळून आली. तसेच रोझ किंग जातीचे २७ पोपटही आढळून आले.
संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ कासव आणि पोपट ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या कासवांच्या प्रजाती या वन्यजीव कायदा १९७२ नुसार अत्यंत दुर्मीळ म्हणून घोषित केल्या आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे. ही कासवे पाच हजारांपासून अधिक किमतीला विकली जातात. ही तस्करी तात्काळ थांबवावी, अशी मागणी अहिंसा संघाचे विनम्रसागर महाराज यांनी केली आहे.