सेमिनरी हिल्सजवळील अनेक झाडांची मुळे खोलवर गेल्यामुळे पाईप लाईनमधून मोठय़ा प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. ही गळती थांबविण्यासाठी त्या भागातील २७१च्या जवळपास लहान मोठी झाडे तोडावी लागणार आहेत. या भागातून पाण्याची गळती थांबली तर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात जास्त पाणी देता येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी दिली.
महापालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर प्रा. लि.च्या माध्यमातून सेमिनरी हिल्स जीएसआरच्या प्रत्यक्ष पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातून  जाणारी पाण्याची पाईप लाईन फुटल्यामुळ आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. यावर तात्काळ उपाययोजना केली नाही तर भविष्यात या भागातील दोन्ही एमबीआरमध्ये पाणी राहणार नाही. शहराची गरज आणि भविष्यातील पाण्याचा धोका टाळण्यासाठी हे काम हाती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी या भागातील सागवान आणि इतर प्रजातीची २७१ पेक्षा जास्त झाडे  तोडणे आवश्यक आहे. बहुतेक झाडांची मुळे खोलवर पाईप लाईनमध्ये गेल्यामुळे दिवसेंदिवस गळती वाढत आहे. या भागात १९१३ आणि  १९७५ मध्ये एमबीआर आणि जीएसआर टाकी बांधण्यात आली असून त्यांना झाडाने वेढले आहे. दोन्हींचे बांधकाम मजबूत असल्यामुळे त्याला धोका नाही. आतमधील पाईपमधून पाण्याची गळती होत आहे. शहराला होणाऱ्या पाणी पुरवठय़ाच्या ७० टक्के पुरवठा या दोन्ही टाक्यांवर अवलंबून आहे. महापालिकेला आणि ओसीडब्ल्यू पर्यावरणाची पूर्ण काळजी आहे. हे काम करताना झाडे तोडण्याची गरज आहे त्याशिवाय या भागात काम करू शकत नाही. जेवढी झाडे तोडणार आहोत त्याच्या पाचपट झाडे लावण्याचे बंधन ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सवर आहे. त्यासाठी त्यांना दाभा परिसरात जागा देण्यात येणार आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याची पूर्ण काळजी महापालिका घेणार आहे. काही सामाजिक आणि पर्यावरणवादी संघटनांनी झाडे तोडण्यास विरोध केला असला तरी त्यांनी सध्याची जी परिस्थिती आहे ती जाणून घेणे आवश्यक आहे. ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सने या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेला दिल्यानंतर सर्वसंमतीने या भागातील काम सुरू करण्यात येणार आहे. वन विभागाकडे या संदर्भात प्रस्ताव देण्यात आला असून त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. सेमिनरी हिल्स येथील जीएसआर ७०-८० वर्षे जुने असून इतक्या वर्षांत त्याची कुठलीही देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नव्हते. ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍स हे काम हाती घेण्यात येणार असून नागरिकांनी त्यास सहकार्य करावे, असे आवाहन वर्धने यांनी केले.