महाराष्ट्र राज्य स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संघटनाची २७वी शैक्षणिक परिषद येथील शिवाजी विद्यापीठ परिसरात दि.२८, २९ व ३० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद आयोजित करण्याचा बहुमान तब्बल १७ वर्षांनी कोल्हापूरला मिळाला असून, या निमित्ताने १ हजारापेक्षा अधिक स्त्रीरोगतज्ज्ञ संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित राहणार आहेत.    
परिषदेचे उद्घाटन उद्या २८ डिसेंबर रोजी सायंकाळी होणार आहे. याप्रसंगी उद्घाटक व प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध लेखिका डॉ. स्नेहलता देशमुख उपस्थित राहणार आहेत. व्यवसायाने त्या पेडियाट्रिक सर्जन असून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. या वेळी महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.    
‘गर्भाशय वाचवूया’ ही या परिषदेची संकल्पना असून गर्भाशयाची पिशवी काढण्याचे संभाव्य धोके आणि दुष्परिणाम याबद्दलची माहितीपूरक व्याख्याने व चर्चासत्रे याद्वारे विचारांची देवाणघेवाण केली जाणार आहे. बदलती जीवनशैली, उशिरा होणारे विवाह व गर्भधारणा यामुळे गर्भधारणेच्या काळात स्त्रियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते याबद्दल या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. या परिषदेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून कसबा बावडा येथील अ‍ॅपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये पाच विशेष कार्यशाळांचे आयोजन केले आहे. या ठिकाणी दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, दुर्बल शस्त्रक्रिया यांचे आयोजन करण्यात आले आहे. चेन्नई येथील जगविख्यात रेडिऑलॉजी विशेष तज्ज्ञ डॉ. एस. सुरेश हे याप्रसंगी उपस्थित स्त्रीरोगतज्ज्ञांना अल्ट्रासोनोग्राफीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.    २९ डिसेंबरला सायंकाळी व्ही. टी. पाटील हॉल येथे बदलती जीवनशैली व चाळिशीनंतरचे जीवन या विषयांवर एक परिसंवाद आयोजित केला आहे. यामध्ये सर्वाना मोफत प्रवेश असणार आहे.