गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत महापालिकेने पथनाटय़ाद्वारे जनजागृती मोहीम सुरू केली आहे. शहरात २८२ सोनोग्राफी सेंटर्स नोंदणीकृत असून सर्व केंद्रांवर लक्ष दिले जात आहे. लिंग निदान करून गर्भपात केल्याचे लक्षात आल्यास केंद्रावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील परिचारिकांची कार्यशाळा नुकतीच झाली.
या मोहिमेची सुरुवात महापालिकेच्या ‘पीसीपीएनडीटी’च्या नोडल अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांनी केली. मुलगा-मुलगी समानता आता यायला लागली असली तरी अजूनही पाहिजे तसा परिणाम दिसून येत नाही. रुग्णालयातील परिचारिकांनी त्यांच्या परिसरातील रुग्णालयात वारंवार भेटी द्यायला हव्या, असे डॉ. सोनकुसळे म्हणाल्या. सोनोग्राफी केव्हा करावी?, एखादी गरोदर महिला गर्भपात तर करीत नाही? यावर लक्ष ठेवावे, याबाबत महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सविता मेश्राम यांनी विचार व्यक्त केले. महापालिकेचे अभियोक्ता व्यंकटेश कपले यांनी पीसीपीएनडीटी कायद्याबाबत माहिती दिली. या वेळी व्यवहार व न्याय अभियोक्ता प्रकाश बरडे, सूरज पारोचे, व्यवहार न्याय अभियोक्ता कल्पना वानखेड, प्रदीप कुंभारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सोनकुसळे यांनी केले.