सुनील तानाजी जाधव (रा. सायबर चौक, राजारामपुरी) यास पळवून नेऊन मारहाण करून ८ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शुक्रवारी येथील संग्रामसिंह श्रीकांत घाटगे (वय २८ रा. कदमवाडी), वैभव विजय पाटील (वय २६ रा. हिरा अपार्टमेंट) व श्रीकांत पंडित सुर्वे (रा. मणेरमळा, उचगाव) या तिघा आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात उभे केले असता २६ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सदर गुन्हय़ातील चौथा आरोपी विजय रमेश माने हा फरारी आहे, अशी माहिती शुक्रवारी पोलीस उपअधीक्षक विठ्ठल पवार यांनी पत्रकार बैठकीत दिली.    
या गुन्हय़ाबाबत अधिक माहिती देताना पोलीस उपअधीक्षक पवार म्हणाले, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वरील उपरोक्त चौघा आरोपींनी सुनील जाधव यास घरातून बाहेर बोलावून घेऊन बळजबरीने बीएमडब्ल्यू गाडीमध्ये घातले. त्यानंतर त्यांनी जाधव यास सोनतळी येथील शेतघरात नेऊन त्याला कोंडून घातले. त्यानंतर जाधव यास नग्न करून उसाच्या दांडक्याने पाठीवर, चेहऱ्यावर मारहाण करून त्याच्या वडिलांना व मित्रांना फोन करण्यास सांगून ८ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर त्यास ठार मारण्याची धमकी दिली. २१ नोव्हेंबर रोजी आरोपींनी जाधव यास मोरेवाडी नजीकच्या पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या एका बांधकाम इमारतीमध्ये डांबून ठेवले असल्याची माहिती एका खबऱ्याकडून राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक मा. शा. पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला असता सुनील जाधव यास डांबून ठेवून तिघे आरोपी तेथे बसले होते. त्यानुसार या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, चौथा आरोपी विजय रमेश माने हा फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.