तालुक्यातील माहीजळगाव येथे खोल असलेल्या विहिरीचे काम सुरू असताना ठिसूळ खडक अचानक खाली कोसळला. या ढिगा-याखाली दबून तीन मजूर जागीच ठार झाले. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कांतिलाल इरकर (वय ३५), सीताराम इरकर (वय ३६, दोघेही रा. झिंजेवाडी, कर्जत) व पिन्या देवकाते (वय ४०, रा. सीतपूर, कर्जत) हे मजूर जागीच ठार झाले. तालुक्यात अजूनही पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे आहे या विहिरींची खोली वाढवून पिके जगवण्याचे काम शेतकरी करीत आहेत.
माहीजळगाव येथील शिंदे यांच्या शेतात विहीर खोल करण्याचे काम सुरू होते. गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास काम सुरू असताना विहिरीच्या मध्यभागावरील खडकाचा ठिसूळ भाग अचानक कोसळला, त्याच्या बरोबर मोठे दगडही निखळून खाली पडले. या वेळी खाली काम करणारे दोघे मजूर एकाच मोठय़ा दगडाखाली दबून जागीच ठार झाले. कांतिलाल इरकर हा जिवंत होता, मात्र मोठय़ा ढिगा-याखाली सापडला होता. त्याचा छातीपर्यंतचा भाग ढिगा-याखाली होता. तो मदतीसाठी हात बाहेर काढून याचना करीत होता.
विहीर भरपूर खोल असल्याने काळोखामुळे वरून खालचे काही दिसत नव्हते. राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश तोरडमल, डॉ. शिवाजी राऊत व सामाजिक कार्यकर्ते फारूक बेग यांच्यासह काही ग्रामस्थ मदतीसाठी धाडसाने विहिरीत उतरले. त्यांनी ढिगा-याखाली अडकलेल्या कांतिलाल इरकर याच्यावर विहिरीतच प्रथमोपचार केले, मात्र त्याला वर काढता येत नव्हते. त्याचवेळी आमदार राम शिंदे व प्रभारी तहसीलदार जयसिंग भैसडे येथे पोहचले. शेवटी नगरहून क्रेन मागवून कांतिलाल याला विहिरीतून वर काढण्यात आले, मात्र उपचारासाठी नेत असताना त्याचाही मृत्यू झाला.