अन्न आणि औषध प्रशासनाने बृहन्मुंबई आणि पुण्यात मंगळवारी छापे टाकून १ हजार ७३७ किलो संशयास्पद खवा हस्तगत केला. याची किंमत साडेतीन लाख रुपये असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
दिवाळीच्या दिवसांत तयार करण्यात येणारी मिठाई आणि अन्य खाद्यपदार्थात मोठय़ा प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता असते. आतापर्यंत १ कोटी ४९ लाख ४२ हजार ८८३ रुपये किमतीचा संशयास्पद माल हस्तगत करण्यात आला आहे. यात खाद्यतेल, हळद पावडर, वनस्पती तूप, खवा आदींचा समावेश आहे. १ हजार ६२२ नमुने घेण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. चांदीचा वर्ख असलेली ४८३ पाकिटेही यावेळी हस्तगत केली.