महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तरुणांना लॉजवर भेटायला बोलावून त्यांना बलात्काराच्या गुन्हय़ात अडकविण्याची भीती दाखवून खंडणी वसूल करणाऱ्या मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली असून आतापर्यंत तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. हा सर्व प्रकार मनसेच्या जनहित कक्ष विभागाच्या जुहूगाव येथील कार्यालयात सुरू होता. या प्रकरणात मनसेचा कक्षाचा अध्यक्ष शहानवाज खान याचादेखील या गुन्हय़ात सहभाग असल्याचे समोर आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
रेश्मा अक्रम शेख, गौरी दीपक घोष आणि नासीर युनूस सय्यद अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही मनसेचे कार्यकर्ते आहेत. काही दिवसांपूर्वीन तुर्भे स्टोअर येथील मेहंदी हसन तेजाबुल्ला खान या तरुणाला अशाच पद्धतीने लुबाडण्यात आले होते. रेश्मा हिची खान याच्याशी ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेत तिने त्याला १६ सप्टेंबर रोजी त्रिमूर्ती लॉजवर बोलावून घेतले होते.
या ठिकाणी खान तिला भेटण्यासाठी आला असता, भावाचा वाशीत अपघात झाला असल्याची थाप मारून सोबत रिक्षात बसत असताना कारमधून आलेले नासीर आणि गौरी यांनी त्या दोघांना कारमध्ये घेतले. यानंतर जुहूगाव येथील कार्यालयात नेऊन डांबले.
 रेश्मा हिच्याशी जबरदस्ती केल्याचे सांगत मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी बलात्काराची तक्रार नोंदविण्याची भीती दाखवत त्याच्याकडून जवळपास ८७ हजारांची खंडणी वसूल केली. तसेच त्याचा मोबाइलदेखील काढून घेतला होता. त्याच्या तावडीतून सुटलेल्या खान याने एपीएमसी पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार नोंदवली होती.
या तक्रारीवरून या तिघांना अटक करण्यात आली  होती. या तिघांवर खांदेश्वर पोलीस ठाण्यात यापूर्वी असाच गुन्हा दाखल असून त्यांना अटक झाली होती. वाशी पोलीस ठाण्यातदेखील एका तरुणाने या तिघांनी अशाच पद्धतीने लुटले असल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात जनहित कक्षाचा अध्यक्ष शहानवाज खान याचादेखील सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे मेंगडे यांनी सांगितले आहे.