डंपरने चुकीच्या दिशेने येऊन दुचाकीला धडक दिल्याने बालकांसह तिघेजण गंभीर जखमी झाले. यातील एका बालकाला ६० फूट फरफटत नेल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. कसबा बावडा येथे झालेल्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मद्यपी चालकाला नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. या अपघातात दत्तात्रय मारुती मंगरे, अभिषेक मल्लिकार्जून कदम व प्रसाद कदम अशी जखमींची नावे आहेत.    
कसबा बावडा येथून पोमन दारासिंग चव्हाण हा चालक कोल्हापूरकडे निघाला होता. कसबा बावडा येथील भगवा चौक येथे आल्यानंतर त्याचा वाहनावरील ताबा सुटला. मद्यप्राशन केलेल्या चालकाने गाडीविरुध्द दिशेला घातली. ती समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकली. ही धडक जबरदस्त असल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अपघातात दत्तात्रय मंगरे व अभिषेक कदम हे दोघे रस्त्याच्या कडेला उडून पडले. तर प्रसाद हा ६० फूट फरफटत गेला.
 अपघातानंतर चालक चव्हाण पळून गेला. भगवा चौकातील तरुणांनी पाठलाग करून त्याला पितळी गणेश मंदिराजवळ पकडले. तेथे त्याला बेदम चोप देण्यात आला. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.