ग्रामीण भागातील जनतेमध्ये नेत्रचिकित्सेबाबत असणाऱ्या उदासीनतेमुळे उद्भवणारे नेत्रदोष कमी करण्यात बदलापूर येथील साकिब गोरे प्रणीत चळवळीचे मोठे योगदान असून यंदा २३ व्या वर्षी या उपक्रमात तब्बल तीन हजार विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून ३० ते ३५ हजार नागरिकांना चष्मे देण्यात येणार आहेत.
बदलापूर गावात राहणाऱ्या साकिब गोरे आणि त्यांच्या मित्रांनी २३ वर्षांपूर्वी १९९० मध्ये या उपक्रमाची सुरुवात केली.सुरुवातीला काही मोजकीच शिबिरे व्हायची. मात्र वर्षांगणिक शिबिरांची आणि रुग्णांची संख्या वाढत गेली. आधी हा उपक्रम फक्त बदलापूर शहरापुरता मर्यादित होता. आता तो अंबरनाथ, मुरबाड, कल्याण आणि उल्हासनगर अशा चार तालुक्यांमध्ये राबविला जातो. यंदा तर सप्टेंबर ते एप्रिल या कालावधीत एकूण ३७ शिबिरे होणार असून आता डिसेंबरअखेर त्यातील ११ शिबिरे झाली आहेत. चार तालुक्यातील तब्बल १२१५ गाव-पाडय़ांतील रहिवाशांसाठी एकूण १३९ नेत्र तपासणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्या केंद्रांवर तपासणी झाल्यानंतर नंबर असणाऱ्यांना चष्मे, तर मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांवर उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जाते. यंदा उपरोक्त केंद्रांवर परिसरातील ४५ हजार ८२७ नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यात ३ हजार १०९ मोतीबिंदूचे रुग्ण आढळले असून २७ हजार ५६७ जणांना चष्मे देण्यात येत आहेत. आतापर्यंत त्यापैकी १ हजार ८२ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली असून जागतिक आरोग्य दिनापर्यंत (७ एप्रिल) सर्व रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होतील, अशी माहिती साकिब गोरे यांनी दिली. पूर्वी या शिबिरांमध्ये टाक्याच्या शस्त्रक्रिया व्हायच्या; परंतु आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने दुर्बिणीच्या साहाय्याने बिनाटाक्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. या उपक्रमात ग्रामीण भागातून रुग्ण आणण्यापासून त्यांची सर्व देखभाल साकिब गोरे आणि त्यांचे सहकारी करतात.
शस्त्रक्रियेदरम्यान चार दिवस त्यांचा रुग्णालयात मुक्काम असतो. तिथे त्यांची व्यवस्थित शुश्रूषा केली जाते. डॉ. राजू मुस्कवाड, डॉ. विलास आफळे, डॉ. आनंद चोळकर, डॉ. नीलेश देसक, डॉ. विजय नवरे, डॉ. की. व्ही. गायकवाड आदी नेत्रतज्ज्ञ या शस्त्रक्रिया करतात. शासकीय आरोग्य योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी एक उत्तम माध्यम म्हणून साकिब गोरे आणि त्यांचे सहकारी अतिशय उत्तमपणे काम करीत आहेत.