राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात परीक्षा काळात चुकीच्यावेळी प्रश्नपत्रिका फोडून संपूर्ण परीक्षा विभागालाच वेठीस धरणाऱ्या ३० परीक्षा केंद्रांवर बंदी घालण्याबरोबरच नावे उघडकीस आली असून त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात दंड वसूल करण्याची कारवाई सुरू आहे.
वर्षभर परीक्षा भवन परीक्षेच्या कामात व्यस्त असते. एकूण ६६७ महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित असून ४० पदव्युत्तर विभाग विद्यापीठात अध्यापनाची कामे करतात. अपुरे मनुष्यबळ आणि ८००च्यावर परीक्षा त्यामुळे परीक्षा विभागावर मोठा ताण असतो. अलीकडच्या काळात हेतूपुरस्सर पेपरफोड करून पैसे कमावणाऱ्या केंद्र प्रमुख, प्राचार्याची संख्या वाढत आहे. अर्थात काही प्रकरणात विद्यापीठाचीही चूक असल्याने शिस्तपालन कृती समितीने (डीएसी) त्याची गंभीर दखल घेत प्रशासनावर ताशेरे ओढण्यास कमी केले नाही. पेपर फोडण्यासंदर्भात २०१० पासूनची प्रलंबित प्रकरणे यावर्षी डीएसीने निकालात काढून त्याचे कार्यवृत्त परीक्षा मंडळात (बीओई) मंजूर करण्यात आले. आर्वीचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय, आमगावचे भवभूती कॉलेज, गोंदियाचे एनएमबी महाविद्यालय आणि वर्धेचे राणी अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालय राजुऱ्याचे शिवाजी महाविद्यालय आणि लाखनीचे समर्थ महाविद्यालय, वध्र्याचे न्यू कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, चंद्रपुरातील तुकूमचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, वध्र्याचे जी.एस. महाविद्यालय, वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूरचे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, वर्धा पिपरीचे श्री जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय, कोरपनाचे कला व वाणिज्य महाविद्यालय, भारसिंगीचे अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय, अंजूमन अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी नकळत तर काही ठिकाणी हेतूपुरस्सर प्रश्नपत्रिका फोडण्यात आल्या. त्या प्रकरणी बहुतेकांवर परीक्षेचे काम करण्यावर बंदी घालून परीक्षा घेण्यासाठीचा खर्च त्यांच्याकडून वसूल होणार आहे.
परीक्षा केंद्र क्रमांक ८७८ आणि २५४ च्या केंद्र प्रमुख आणि पर्यवेक्षकांवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. २५२ क्रमांकाच्या केंद्राच्या प्रमुखांना केवळ ताकीद देण्यात आली आहे तर ३३१ वरील केंद्र प्रमुखांकडून खर्च वसूल करण्यात आला आहे. केवळ परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयांवरच नाही तर पेपर पुढे ढकलून त्याची माहिती परीक्षा केंद्रांना वेळेत न देणाऱ्या महाविद्यालयास सहानुभूती दाखवून डीएसीने विद्यापीठ प्रशासनावर कडक ताशेरे ओढले. दयानंद  आर्य कन्या महाविद्यालय, वध्र्याचे न्यू आर्ट वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोराडीचे कला व विज्ञान महाविद्यालय, भद्रावतीचे शिंदे विज्ञान महाविद्यालय आणि आर्वीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाबरोबरच ८२९ आणि ८३४ या परीक्षा केंद्रांना डीएसीने सहानुभूती दर्शवली.
या संदर्भात परीक्षा केंद्र प्रमुखांकडून दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून इतर माहिती देण्यास प्रभारी परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते यांनी नकार दिला.