‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..’ या जयघोषात सांगली-मिरजेत लाडक्या बाप्पाला हजारो भाविकांनी उत्साहाने निरोप दिला. बुधवारी सकाळी सुरु झालेली विसर्जन मिरवणूक गुरुवारी दुपारी १२ वाजता अंतिम मूर्तीच्या विसर्जनाने संपली. मिरजेत सलग ३० तास सुरु असलेली विसर्जन मिरवणूक मोठय़ा उत्साहात आणि शांततेत पार पडली.
बुधवारी सकाळी शहराच्या विविध भागात स्थापन झालेल्या १६० हून अधिक सार्वजनिक मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. बुधवारी  सकाळी ८ वाजता ब्राह्मणपुरीतील  संभा तालीम मंडळाच्या श्रींची विसर्जन मिरवणूक सुरु झाली.  पहिल्या गणपतीचे विसर्जन गणेश तलावात झाले. त्यानंतर सायंकाळपर्यंत तुरळक मंडळांचे गणेश विसर्जन झाले.
बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर मिरजेतील बहुसंख्य मंडळांच्या विसर्जन मिरवणुका मार्गस्थ झाल्या. शिवाजी रोड, स्टेशन रोड, नदी वेसकडून येणाऱ्या डॉ. आंबेडकर रोड, विजापूर वेस आदी मार्गावरुन विसर्जन मिरवणुका किसान चौकाकडे येत होत्या. ढोल-ताशांसह लेझीम, झांजपथक, सिनेसंगीताच्या ध्वनिमुद्रिका प्रसारित करणारे ध्वनी क्षेपक, वाद्यवृंद आदींच्या निनादात या मिरवणुका निघाल्या होत्या. सर्वच मार्गावर मिरवणुका आल्याने हे मार्ग कार्यकर्त्यांच्या आणि गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते.
सायंकाळी सात नंतर विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लक्ष्मी मार्केट चौकात जनसमुदाय एकत्रित आला. मार्केटच्या पूर्वेस एकाच वेळी चारही मार्गावरुन येणाऱ्या मिरवणुकांमुळे याच ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. नगरसेवक सुरेश आवटी यांच्या मंडळापुढे वेगवेगळ्या कसरती सादर करणारे लेझीम पथक,पाहणाऱ्यानाही ताल धरायला लावणारे ठरले. स्वत सुरेश आवटी आणि नगरसेवक निरंजन आवटी हेसुद्धा लेझीम खेळण्यासाठी पथकात सहभागी झाले होते.
गुरुवार पेठ गणेशोत्सव मंडळाने सादर केलेले केरळी लोकनृत्य हे सुद्धा यंदाच्या उत्सवाचे आकर्षण ठरले. केरळी महिला ढोलाच्या तालावर वेगवेगळे कसरतीचे प्रयोग सादर करीत होत्या. मोठमोठे मुखवटे  हे सुद्धा बच्चे कंपनीबरोबरच मोठय़ांनाही आकर्षति करणारे ठरले. याच मंडळाच्या मिरवणुकीत नगरसेवक संजय मेंढे आणि महापालिकेतील काँग्रेसचे गट नेते किशोर जामदार यांनी नृत्य करुन गणेशोत्सवाचा आनंद लुटला.
विसर्जन मिरवणूक मार्गावर विविध संघटनांनी उभारलेल्या स्वागत कमानी  हे मिरजेच्या उत्सवाचे आगळेवेगळे वैशिष्टय़ ठरले. लक्ष्मी मार्केट परिसरात शिवसेना, मराठा महासंघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, िहदू एकता आंदोलन यांनी स्वागत कमानी उभारल्या होत्या. मिरवणुकीच्या मार्गावर संभाजी तरुण मंडळ, विश्वशांती यांच्यासह स्वागत कमानी उभारणाऱ्या संघटनांकडून प्रत्येक गणेश मंडळाचे स्वागत करण्यात येत होते. या शिवाय महापालिका आणि किशोर जामदार युवा मंच यांच्यावतीने स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. महापालिकेच्या वतीने प्रत्येक मंडळाला स्मृतिचिन्ह, हार, श्रीफळ देऊन स्वागत केले.
विसर्जन मिरवणुकीत लाखांहून अधिक गणेश भक्तांचा महापूर लोटला होता. बुधवारी ढगाळ हवामान असल्यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन अनेक मंडळांनी विर्सजन मिरवणुका भाविकांना पाहता याव्यात यासाठी लवकरच मार्गस्थ केल्या होत्या. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांचा आनंद सगळ्यांनाच घेता आला. रात्री १२ वाजता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्वच वाद्यं बंद करण्यात आली. गणेश तलावात १० फूट उंचीच्या मूर्तीपर्यंत विसर्जनाची सोय करण्यात आली होती. त्यावरील उंचीच्या गणेशमूर्तीसाठी कृष्णा घाट येथे महापालिकेने व्यवस्था केली होती. गुरुवारी दुपारी कैकाडी समाज आणि संत रोहिदास मंडळाच्या सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली.
गणेशोत्सवाच्या शुभेच्या देण्यासाठी महापौर कांचन कांबळे, आ. सुरेश खाडे, माजी आ. हाफिज धत्तुरे, नगरसेवक अतहर नायकवडी, बसवेश्वर सातपुते, मनसेचे सुधाकर खाडे, शिवसेनेचे शहरप्रमुख विकास सूर्यवंशी, बजरंग पाटील, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन िशदे, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष  प्रकाश इनामदार आदींसह अनेक राजकीय कार्यकत्रे, महापालिका उपायुक्त नितीन कापडनीस आदी उपस्थित होते.
गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी तब्बल ११०० पोलिस व गृहरक्षक जवान तनात करण्यात आले होते. मिरवणूक मार्गावर चार उंच मनोरे उभारण्यात आले होते. याशिवाय २२ ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यात येत होते. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान स्वत पूर्णवेळ मिरवणुकीत बंदोबस्तासाठी लक्ष्मी मार्केट परिसरात ठाण मांडून होते. अधीक्षक दिलीप सावंत आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन स्थितीची पाहणी केली.