दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे, परंतु या प्रवेश प्रक्रियेत काही महाविद्यालयांकडून विनाअनुदानाच्या नावाखाली ३० ते ४० हजार रुपयांची देणगी मागून विद्यार्थ्यांची लूट करण्याचे प्रकार घडत असल्याने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. या लुटीमुळे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
उरण तालुक्यात तीन उच्च, तर १३ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. सध्या महाविद्यालयातील प्रवेशासाठीची लगबग सुरू आहे. यामध्ये उच्च शिक्षणासाठी आयटी घेऊन पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन प्रवेश संख्या वाढलेली आहे. तर दुसरीकडे ११ वी प्रवेशासाठीच्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. तालुक्यात काही महाविद्यालयांत विनाअनुदानित तुकडय़ांचीच संख्या अधिक आहे. या महाविद्यालयात प्रवेशासाठी व्यवस्थापनाकडून ३५ ते ४० हजार रुपयांच्या देणगीची मागणी केली जात आहे. त्यामुळे शिक्षणासाठी गुणवत्ता असूनही केवळ देणगी भरण्यासाठी पैसे नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असलेले शिक्षण घेता येत नाही, अशी येथे गंभीर परिस्थिती आहे.
यावर्षी निकाल जास्त लागल्याने जागा कमी आणि विद्यार्थी जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विनाअनुदानाचा फायदा घेत महाविद्यालयांकडून विकास निधी, नवीन अभ्यासक्रम अशा विविध नावाने विद्यार्थ्यांकडून निधी वसूल केला जात आहे.
यामध्ये बी.ए., बी.कॉम.च्या अभ्याक्रमाकरिता हजारो रुपये मोजावे लागत आहेत, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. या संदर्भात शिक्षण क्षेत्राशी निगडित एका व्यक्तीशी संपर्क साधला असता नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारा निधी हा विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा, शिक्षकांचे वेतन यावर खर्च केला जात असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे विद्यार्थी निधी देतात तर घ्यायला काय हरकत आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
या संदर्भात रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. मात्र उरण पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील यांनी या संदर्भात विद्यार्थी किंवा पालकांची तक्रार अद्याप आमच्याकडे आलेली नाही. ती आल्यास निश्चित कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.