03 August 2020

News Flash

टीएमटीच्या ताफ्यात ३०० नव्या बसेस

ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन प्रमुख शहरांमधील अंतर्गत वाहतूकीची ‘लाइफलाइन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

| September 18, 2013 08:12 am

ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन प्रमुख शहरांमधील अंतर्गत वाहतूकीची ‘लाइफलाइन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे परिवहन उपक्रमाच्या सक्षमीकरणासाठी महापालिका प्रशासनाने उशिरा का होईना पावले उचलण्यास सुरुवात केली असून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून ३०० बस खरेदीचा नवा प्रस्ताव परिवहन व्यवस्थापकांनी तयार केला आहे. ‘टीएमटी’च्या ताफ्यात सध्या ३१३ बसेस असून त्यापैकी १००हून अधिक पुरेशा देखभालीअभावी आगारातच उभ्या असतात. या पाश्र्वभूमीवर नव्या ३०० बसेसचा प्रस्ताव तयार करताना अतिरिक्त कर्मचारी आणि देखभाल, दुरुस्तीची सक्षम यंत्रणा उभारण्याचे आव्हान परिवहन उपक्रमापुढे असणार आहे.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाची अवस्था अतिशय बिकट बनली असून अपुऱ्या बसेसमुळे ठाणेकरांना दररोज थांब्यावर ताटकळत उभे राहावे लागते. तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांच्या कार्यकाळात टीएमटीच्या कारभाराला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. राजीव यांनी उपक्रमातील काही बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचे हत्यारही उगारले. त्यानंतरही जेमतेम २०० ते २२० गाडय़ा आगाराबाहेर काढण्यात राजीव यांना यश आले. ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात सध्या ३१३ बसेस आहेत. यापैकी बहुतांश बसेस देखभालीअभावी नादुरुस्त आहेत. काही बसेस अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आगारात उभ्या असतात. त्यामुळे भाडय़ाने बस चालविण्याचा निर्णय मध्यंतरी उपक्रमाला घ्यावा लागला. ठाण्यातील प्रवाशांची लोकसंख्या लक्षात घेता अंतर्गत वाहतुकीसाठी सक्षम अशी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. त्यासाठी ट्राम, स्कॉयबस असे वेगवेगळे पर्यायही यापूर्वी सुचविण्यात आले आहेत. मात्र, टीएमटीच्या सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे सध्या उपलब्ध असलेली सेवा रडतखडतच सुरू आहे.
३०० बसेसचा नवा प्रस्ताव
या पाश्र्वभूमीवर उपक्रमाच्या ताफ्यात आणखी नव्या बसेस आणाव्यात, अशा स्वरूपाचा प्रस्ताव मध्यंतरी परिवहन प्रशासनाने तयार केला होता. यानुसार दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून ७१ बसेसच्या खरेदीचा प्रस्ताव प्राथमिक स्तरावर तयारही करण्यात आला. या प्रस्तावात सुधारणा सुचवत विद्यमान आयुक्त असीम गुप्ता यांनी ७१ ऐवजी थेट ३०० बस खरेदीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश परिवहन प्रशासनास दिले असून त्यानुसार नवा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या अर्बन ट्रान्स्पोर्ट विभागाचे साहाय्यक सचिव यांच्यामार्फत ठाणे महापालिकेस नुकतेच एक पत्र प्राप्त झाले असून यानुसार अहवाल तयार करताना कोणती मार्गदर्शक तत्त्वे आखावीत यासंबंधीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यानुसार परिवहन उपक्रमाने ३०० बसेसचा प्राथमिक अहवाल तयार केला असून ९०० एमएम फ्लोअरच्या ३० मिडीबस तर १८० मोठय़ा बस खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याशिवाय ३० लो-फ्लोअर वातानुकूलित, तर ६० साध्या बसेसचा अंतर्भावही या प्रस्तावात तयार करण्यात आला आहे. या बसखरेदीची रक्कम ३०० कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता असून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या मानकांनुसार ठाण्यातील सुमारे १८ लाख लोकसंख्येसाठी ५४५ बसेसची आवश्यकता आहे. ३०० नव्या बस खरेदी केल्यास टीएमटीच्या ताफ्यात ६००पेक्षा अधिक बसेसची उपलब्धता होऊ शकेल. असे असले तरी बस खरेदीसोबत नवा कर्मचारी वर्ग आणि देखभाल, दुरुस्तीसाठी सक्षम यंत्रणा उभारणे तितकेच गरजेचे आहे, असे मत महापालिकेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. यासंबंधीच्या प्रस्तावास परिवहन समितीच्या मान्यतेनंतर लवकरच सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यात येणार आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराच्या नेमणुकीच्या प्रस्तावासही मान्यता देण्यात येणार आहे, असे म्हस्के यांनी स्पष्ट केले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2013 8:12 am

Web Title: 300 new buses in tmt scod
Next Stories
1 गोधनातून आदिवासी विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन!
2 सेकंड इनिंग.. समाजसेवेची!
3 गोविंदवाडी रस्ता रखडलेलाच!
Just Now!
X