अंधेरीच्या ‘स्वामी मुक्तानंद हायस्कुल’मध्ये विलेपार्ले ते गोरेगाव परिसरातील शाळांचे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले असून तब्बल ३०० विज्ञान प्रकल्प यात मांडण्यात आले आहेत.
महापौर सुनील प्रभु यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्धाटन करण्यात आले. या भागातील ११२ शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प यात मांडले असून प्रदर्शनात १० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. अंधेरीच्या वीरा देसाई मार्गावरील एमव्हीएम एज्युकेशनल कॅम्पसमध्ये हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शनिवारी या प्रदर्शनाची सांगता पारितोषिक वितरण समारंभाने होईल.
उद्घाटन प्रसंगी प्रभु यांनी प्रकल्प तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. येणाऱ्या काळात आपल्या देशाने महासत्तेकडे यशस्वी पावले टाकण्यासाठी विज्ञान व शिस्त यांची सांगड घालणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शापूरजी पालनजीचे कॉपरेरेट स्ट्रॅटेजीचे संचालक जे. पी. राव, उपनिरीक्षक विलास कांबळे, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक राजिंदर कौर थिंदे उपस्थित होते.