जालना शहरात तीनशे खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा विचार प्रसिद्ध बियाणे उद्योजक व श्री गणपती नेत्रालयाचे प्रमुख डॉ. बद्रीनारायण बारवाले यांनी मंगळवारी बोलून दाखविला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रामनगर येथे आयोजित नेत्रतपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन करताना बारवाले बोलत होते. प्रमुख म्हणून जि.प. सदस्य श्यामनाना उढाण उपस्थित होते. बारवाले म्हणाले, की शहरात वैद्यकीय महाविद्यालय असावे, अशी कल्पना काही मंडळींशी चर्चा करताना पुढे आली होती. त्यासाठी सुसज्ज रुग्णालयाची गरज आहे, त्यामुळे विविध आजारांवर उपचाराची सुविधा असणारे तीनशे खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा विचार आहे.
आपल्या गावाजवळ उपचाराची सुविधा असणे ही जनतेची गरज असते. श्री गणपती नेत्रालयाच्या वाशिम येथे सुरू केलेल्या रुग्णालयात सध्या दररोज ६० नेत्ररुग्णांची तपासणी होते. महिनाभरात शंभर शस्त्रक्रिया होतात. पैकी ९५ टक्के रुग्ण वाशिम परिसरातील असतात. याचा अर्थ घरापासून जवळ सुविधा मिळाल्यास रुग्णांचा प्रतिसाद मिळतो. नेत्र शिबिरासाठी अरविंद चव्हाण मित्रमंडळाने श्री गणपती नेत्रालयाकडे जमा केली तेवढय़ाच रकमेची त्यात भर टाकण्याची घोषणा बारवाले यांनी या वेळी केली. दुष्काळी स्थितीत चव्हाण यांनी वाढदिवस नेत्र शिबिराच्या माध्यमातून साजरा केल्याबद्दल त्यांना या वेळी बारवाले यांनी धन्यवाद देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.
अरविंद चव्हाण यांनी बदनापूर मतदारसंघातील जनतेचे आपल्यावर प्रेम असल्याचे सांगून श्री गणपती नेत्रालयाच्या सहकार्याने नेत्रशिबिर घेतल्याचे सांगितले. जि.प. सदस्य श्यामनाना उढाण, डॉ. निसार देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीकांत घुले, कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज बोराडे आदींची भाषणे झाली.
बारवाले व पाहुण्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात काहींना चष्म्यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. रामनगर परिसरातील नेत्ररुग्णांची मोठी गर्दी शिबिरात झाली होती.
अरविंद चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बदनापूर येथेही मोफत नेत्रशिबिर घेण्यात आले. त्याचे उद्घाटन डॉ. निसार देशमुख यांच्या हस्ते झाले.
राष्ट्रवादीचे नेते इकबाल पाशा, पंकज बोराडे, आर. पी. हायस्कूलचे भांदरगे आदींची भाषणे या वेळी झाली.