भारतीय स्टेट बँकेच्या येथील शाखेत अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या महिलेच्या सामाजिक दृष्टिकोनामुळे तब्बल तीनशे महिला घरांच्या खऱ्या अर्थाने मालकीण झाल्या आहेत.   
स्टेट बँकेच्या डोंबिवली पूर्व शाखेतील शाखाधिकारी उषा मजिठीया कर्ज घेण्यासाठी आलेल्या पुरुष कुटुंबप्रमुखांचे समुपदेशन करतात. त्यामुळे नोकरदार नसलेल्या तब्बल तीनशे महिलांनाही पतीबरोबरच घरात मालकी हक्क मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात स्टेट बँकेच्या डोंबिवली पूर्व आणि पश्चिम शाखांच्या माध्यमातून त्यांनी हा उपक्रम पार पाडला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील स्टेट बँकेच्या शाखेत शाखाधिकारी म्हणून काम केल्यानंतर, आता त्या डोंबिवली पूर्वमधील कस्तुरी प्लाझामधील शाखेत शाखाधिकारी आहेत. डोंबिवलीतील ‘ज्ञानदीप स्त्री जागृती मंच’च्या माध्यमातून त्या अनेक र्वष महिलांविषयक जनजागृती कार्यक्रमात सहभागी होत आहेत. त्या माध्यमातून प्रबोधनाचे धडे देत आहेत. मूळ पिंड सामाजिक कार्याचा असल्याने अण्णा हजारेप्रणीत भ्रष्टाचारविरोधी मंचच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे.