नव्या वर्षांचे स्वागत मद्यपानाने करण्याची गेल्या काही वर्षांत रुजलेल्या परंपरेला यंदाचे वर्षही अपवाद ठरले नाही. रात्रभर धागडधिंगा करणारे, मद्यप्राशन करून धुम स्टाईल वाहने चालविणारे, दुचाकींवर क्षमतेहून जादा वाहतूक करणारे शेकडो वाहनधारक पोलिसांच्या कचाटय़ात सापडले. पोलीस यंत्रणेने ठिकठिकाणी राबविलेल्या मोहितेंर्गत शेकडो वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातील मद्यप्राशन करून वाहने दामटविणाऱ्या ३१ चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या चालकांचे वाहन परवाने निलंबित करण्याची कारवाई वाहतूक पोलीस करणार आहेत. या व्यतिरिक्त दंडात्मक कारवाईद्वारे एकाच दिवसात ९० वाहनधारकांकडून ८,५०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.  व्यावसायिकांना पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल्स व रिसॉर्ट खुले ठेवण्याची परवानगी मिळाल्याने मध्यरात्री उशिरापर्यंत डिजे लावून धिंगाणा घातल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले नाहीत. उलट हॉटेल्सची वेळ वाढविल्यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला. पहाटेपर्यंत त्यांना स्थितीवर नजर ठेवणे भाग पडले.
मद्यपींकडून घातला जाणारा गोंधळ सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरतो. खुलेआम मद्यपान करणे, मग धूम स्टाईलने दुचाकी दामटणे, रस्तावर आरडाओरड करत गोंधळ घालणे, कर्णकर्कश आवाजात डिजे लावून धिंगाणा घालणे याद्वारे शहराच्या शांततेला सुरुंग लावण्याचे काम संबंधितांकडून नेटाने केले जाते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा सक्रिय झाली होती. ३ पोलीस उपायुक्त, ४ सहाय्यक पोलीस आयुक्त, ६१ पोलीस निरीक्षक, ७८ सहाय्यक निरीक्षक, १२१ उपनिरीक्षक, २००० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाची तुकडी, २६५ नवप्रविष्ठ पोलीस शिपाई यांच्यासह गृहरक्षक दलाचे जवान रस्त्यावर उतरले होते. वाहतूक पोलिसांच्या मदतीने पोलीस यंत्रणेने शहरातील प्रमुख रस्त्यांवर लोखंडी अडथळे उभारून वाहन तपासणीची धडक मोहीम राबवून मद्यपींवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ यंत्राद्वारे संशयित वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. ३१ डिसेंबरला सायंकाळपासून जल्लोषाचे वातावरण होते. शहरातील जवळपास सर्वच हॉटेल्स गर्दीने तुडूंब भरली होती. आसपासच्या वायनरी व अनेक ठिकाणी पार्टीज्चे आयोजन करण्यात आले. शहरवासीय नववर्षांचे आपापल्या पध्दतीने स्वागत करत असताना मद्यपींनी गोंधळ घालण्याची परंपरा कायम ठेवली.
शहरातील कॉलेजरोड हा महाविद्यालयीन युवकांसाठी आवडता रस्ता. महत्वाच्या घडामोडींवेळी तरुणांकडून या रस्त्यावर जल्लोष केला जातो. बुधवारी रात्री मोटारसायकल, चारचाकी अशा वाहनांद्वारे युवकांचे जत्थे परिसरात घोषणाबाजी करत फिरत होते.
पोलीस यंत्रणेने या ठिकाणी वाहनांची तपासणी केली. या रस्त्यावरील गोंधळ स्थानिकांसाठी तापदायक ठरला. नाशिकरोड, पंचवटी, गंगापूररोड, सिडको, सातपूर परिसरात मद्यपी वाहनधारकांकडून असाच गोंधळ घातला गेला. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुल्लडबाजी करणारे, मद्यपान करून वाहने दामटविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. एकाच दिवसात शेकडो वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात वाहनांची कागदपत्रे न बाळगणारे, मद्यपान करणारे, क्षमतेहून जादा प्रवाशांची वाहतूक, गोंधळ घालणे आदी वेगवेगळ्या कारणास्तव वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यात मद्यपान करून वाहन चालविणारे एकूण ३१ वाहनधारक पोलीस यंत्रणेच्या हाती लागले. त्यांच्याविरुध्द विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या वाहनचालकांची अनुज्ञप्ती अर्थात परवाना निलंबित करण्याची कारवाई केली जाईल. त्याबाबतचा अहवाल वाहतूक पोलीस विभाग प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविणार असल्याचे या विभागाचे अधिकारी बागवान यांनी सांगितले.