खामगांव तालुक्यातील ज्ञानगंगा प्रकल्पाचे पाणी नदीद्वारे सोडण्यात न आल्याने केळी पिकाचे सुमारे दोन कोटीचे नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी शासनाकडे नुकसान भरपाई मागण्याबाबत आदेश देण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे शेतकरी मदतीपासून वंचित असून, नुकसान भरपाई मिळण्याची मागणी वर्णा येथील सरपंच संतोष वाघ यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, मागील वर्षी ज्ञानगंगा धरणातील पाणीसाठा उपलब्ध असूनही व वारंवार शेतकऱ्यांतर्फे शासन दरबारी जलवाहिन्याच्या दोन व्हॉल्व्हमधून सारोळा व वर्णा केवळ ७० हजार घनमीटर पाणी होते. ते पाणी देण्याची विनंती शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली होती. मात्र, मागणी मान्य झाली नाही. यामुळे ३२ शेतकऱ्यांचे दोन कोटी रुपयांचे केळी उत्पादन बुडाले. शेतकऱ्यांनी ७० हजार घनलिटर पाणी त्वरित उपलब्ध करून द्यावे, यासंबंधी उन्हाळ्यात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर घनश्याम रतनसिंग पाटील, सुनील भगवानसिंग इंगळे, शालिकराम रतनसिंग पाटील, संतोष प्रल्हाद वाघ, अरूण महासिंग इंगळे, भागवत महासिंग इंगळे, सुनील सुपडा वावगे, गजानन सुगदेव कळसकार, जयसिंग हिंमतसिंग इंगळे आदिंसह ३२ शेतकऱ्यांनी याचिका दाखल केली होती, पण सुनावणीदरम्यान लवकर पाऊस आल्यामुळे उच्च न्यायालयाने अर्जदारांना याचिका मागे घेण्याची परवानगी दिली. त्याचबरोबर शासनाकडे नुकसान भरपाई देण्यासंबंधी मागणी करण्याचे आदेश दिले होते.
याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अविनाश काळे यांनी मुख्य सचिवांकडे प्रत्यक्ष भेटून दोन कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी संबंधित कागदपत्रे जोडलेले अंदाजे ४० पानी निवेदन सादर केले. या निवेदनाची दखल घेऊन मुख्य सचिवालयाच्या कार्यालयाकडून महसूल विभागाकडे संबंधित सचिव म्हैसकर यांच्याकडे योग्य कार्यवाहीसाठी कागदपत्र सादर केले, पण अजूनपर्यंत याचिकाकर्त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीसंबंधी अधिकारीही बेफिकीर आहेत. त्याचप्रमाणे सतत अधिकाऱ्यांकडून पाणी वाटपासंबंधात दिशाभूल करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी पंचनाम्यात अर्जदार शेतकऱ्यांची जमीन अंदाजे दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या अहवालात स्थळ पाहणीत वरणा गावच्या उत्तर व दक्षिण बाजूस असणाऱ्या दोन व्हॉल्व्हमधून शेतकऱ्यांची शेतजमीन वॉल्व्हपासून २ कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे सदर वॉल्व्ह व केळी उत्पादक शेतकऱ्यांची शेतजमीन या दरम्यान असणाऱ्या ज्ञानगंगा नदीपात्रातून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी होण्याची शक्यता आहे.