खरीप हंगामात या वर्षी आतापर्यंत १ लाख ३७ हजार ५६३ शेतकऱ्यांना ३२२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस. आर. देशमुख यांनी दिली.
जिल्हय़ात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाची घाई चालू आहे. बी-बियाणे, खत खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या हातात पसा लागतो. पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये, यासाठी सर्व जिल्हा बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले जाते. गतवर्षी बँकेने १००.५३ टक्के इतके पीककर्ज वाटप केले होते. या वर्षी ऑक्टोबरअखेपर्यंत खरीप हंगामाचे ३९६ कोटी रुपयांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा बँकेला देण्यात आले आहे. २५ जूनपर्यंत ३२२ कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे. मागेल त्याला पीककर्ज देण्याची पद्धत बँकेने सुरू केली आहे. आíथकदृष्टय़ा सक्षम असणाऱ्या जिल्हा बँकेच्या यादीत लातूर जिल्हा बँकेचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्हय़ातून लातूर जिल्हा स्वतंत्र झाल्यानंतर बँकेकडे केवळ १० कोटींच्या ठेवी होत्या. आज १ हजार १७ कोटींच्या ठेवी बँकेकडे आहेत.
आमदार दिलीपराव देशमुख यांनी अवसायनात असलेली जिल्हा बँक कुशल प्रशासन राबवून राज्यातील अव्वल बँक केली. जिल्हा बँकेच्या कोणत्याही शाखेची उलाढाल ही १० कोटींपेक्षा कमी नाही. दरवर्षी शेतकरी सभासदांना लाभांश दिला जातो. एनपीएचे प्रमाण शून्य टक्के आहे. तर ढोबळ एनपीए केवळ ४.१४ टक्के आहे. जिल्हय़ातील सिंचनक्षेत्र वाढण्यासाठी ठिबक, तुषारसाठीही मोठी कर्जरक्कम वितरित करण्यात आली असल्याचे देशमुख यांनी सांगितले.