News Flash

सोलापुरात सुशीलकुमारांच्या घरावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न; ३२५ अटकेत

संघ परिवाराकडून हिंदू दहशतवादी तयार केले जात असल्याचा आरोप केल्याच्या निषेधार्थ केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात बुधवारी दुपारी भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद,

| January 30, 2013 09:35 am

संघ परिवाराकडून हिंदू दहशतवादी तयार केले जात असल्याचा आरोप केल्याच्या निषेधार्थ केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात बुधवारी दुपारी भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी हिंदुत्ववादी संघटनांनी शहरात सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानावर मूकमोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करून मोर्चा अडविला आणि ३२५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यात भाजपचे आमदार विजय देशमुख, माजी खासदार सुभाष देशमुख आदींचा समावेश होता.
जयपूर येथे काँग्रेसच्या शिबिरात सुशीलकुमार शिंदे यांनी देशात हिंदू दहशतवादी तयार करण्याचे प्रशिक्षण संघ परिवाराकडून दिले जात असल्याचा आरोप केला होता. त्या विरोधात संघ परिवाराने आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे. त्याचाच भाग म्हणून शिंदे यांच्या सोलापुरात संघ परिवाराने मूकमोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. होम मैदानावरून निघालेल्या या मूकमोच्र्याला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. सात रस्त्यावरील शिंदे यांच्या जनवात्सल्य निवासस्थानावर हा मोर्चा डफरिन चौकमार्गे जुन्या एम्प्लायमेंट चौकाच्या दिशेने जात असताना वाटेत सह्य़ाद्री व्यापार संकुलाच्या अलीकडे पोलिसांनी हा मोर्चा रोखला. दरम्यान, सकाळपासून पोलिसांनी शिंदे यांच्या जनवात्सल्य निवासस्थानाच्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चा अडविण्यात आला त्यावेळी राज्य राखीव पोलिसांसह सुमारे तीनशे पोलिसांचा बंदोबस्त होता.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार सुभाष देशमुख, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष, आमदार विजय देशमुख, सरचिटणीस दत्तात्रेय गणपा, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर, बजरंग दलाचे संघटक तथा भाजपचे नगरसेवक नरेंद्र काळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह दामोदर दरगड, राजेंद्र काटवे आदींचा मोच्र्यात प्रामुख्याने सहभाग होता. याशिवाय नगरसेवक सुरेश पाटील, नागेश वल्याळ, माजी नगरसेवक संजय कोळी यांच्यासह सुमारे एक हजार कार्यकर्ते मोच्र्यात सहभागी झाले होते.  मात्र पोलिसांनी मोर्चा अडवून अटकसत्र सुरू केले तेव्हा बरेचशे कार्यकर्ते स्वत:ला अटक करून न घेता निघून गेले. पोलिसांनी २० महिला व ३०५ पुरुष कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर उशिरा सोडून दिले.
पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी कोणताही वाद घातला नाही. यावेळी सुभाष देशमुख यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. भाजपसह संघ परिवार हिंदू दहशतवादी तयार करीत असेल त्याची सखोल चौकशी करावी व या संघटनांवर बंदी घालण्याची हिंमत सुशीलकुमारांनी दाखवावी, अन्यथा स्वत:ची खुर्ची सोडावी, असे आव्हान देशमुख यांनी दिले. जोपर्यंत शिंदे हे सत्तेवरून पायउतार होत नाहीत व माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. यावेळी आमदार विजय देशमुख, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदींची भाषणे झाली.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 9:35 am

Web Title: 325 arrested against march on sushilkumar shindes house
Next Stories
1 वाई अर्बन बँकेच्या सरव्यवस्थापकपदी दीक्षित
2 राज्यस्तरीय गायन स्पर्धा
3 आमदार उंडाळकरांचे पुत्र उदयसिंह पै. संजय पाटील खून प्रकरणी अटकेत
Just Now!
X