लोकसभा, विधानसभा, महापालिका या निवडणुका पार पडल्यानंतर ऐरोली व बेलापूर मतदारसंघांत मतदारांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. या सर्वेक्षणात ऐरोली व बेलापूर मतदारसंघांमध्ये तब्बल दोन लाख ३२ हजार ५९१ मतदार बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. आता ही सर्व नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. लोकसभा, विधानसभा, पालिका निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप सर्वच राजकीय पक्षांनी केला होता. त्यामुळे ऐरोली मतदारसंघामध्ये एक लाख १६ हजार १९७ व बेलापूर मतदारसंघामध्ये एक लाख १६ हजार ३९४ नावे आढळून आली आहेत. सर्वेक्षणात अनेक मतदारांचे पत्ते आणि इतर पुरावे सापडले नाहीत. अनेक मतदार एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित झाले आहेत. काही मृत झाले आहेत. काहींची नावे दोन वेळा असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने ऐरोली व बेलापूर मतदारसंघांतील मतदारांचे सर्वेक्षण करत असताना मतदार यादीतील नावांबरोबर आधार कार्डचा नंबर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही बोगस नावे समोर आली आहेत. तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून ही नावे वगळण्यात येणार असल्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. त्यावर नगरसेवक किशोर पाटकर यांनी बोगस मतदान करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.