नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सावरीकर यांनी मंगळवारी जि.प.मधील विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली. या दरम्यान विविध विभागांत ३३ कर्मचारी गरहजर असल्याचे आढळून आले. या ३३ जणांवर कारणे दाखवा नोटिस देतानाच एक दिवसाचे वेतन कपातीची कारवाई करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी नवे ‘सीईओ’ म्हणून सावरीकर यांनी सूत्रे स्वीकारली. मावळते ‘सीईओ’ नृसिंह मित्रगोत्री यांच्यावर पारित झालेल्या अविश्वास ठरावानंतर मित्रगोत्री यांना सरकारने परत बोलविले. त्यानंतर या पदावर सावरीकर यांची नियुक्ती झाली. सोलापूर महापालिका आयुक्तपदावरून येथे आलेल्या सावरीकर यांनी मंगळवारी सकाळीच जि.प.च्या विविध विभागांना भेटी दिल्या. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे त्यांच्यासमवेत होत्या. विभागांतील ३३ कर्मचारी गरहजर आढळले. त्यांची विभागनिहाय संख्या – बांधकाम विभाग ६, पशुसंवर्धन १, बांधकाम उपविभाग १, समाजकल्याण ५, आरोग्य ४, शिक्षण ३, अर्थ २, यांत्रिकी ५, डी.आर.डी. ४, कृषी  २. गरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिस देतानाच एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कारवाई करण्यात आली.
मित्रगोत्री यांना सायंकाळी जि.प.च्या बाबुराव पाटील गोरेगावकर सभागृहात निरोप देण्यात आला. जि.प.च्या अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांची या वेळी उपस्थिती होती.