थॅलेसेमिया या आजारासंदर्भात सर्वसामान्यांमध्ये जनजागृतीचा एक भाग म्हणून येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील १२ हजार विद्यार्थ्यांमध्ये या आजाराची शक्यता तपासणीसाठी वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या असता ३४ विद्यार्थ्यांमध्ये थॅलेसेमिया वाहक जनुक असल्याचे निदान करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे समुपदेशन, शंकांचे निरसन व मार्गदर्शनही करण्यात आले.
थॅलेसेमिया हा सामान्यत: आढळणारा जनुकीय आजार आहे. भारतामध्ये या आजाराचे मोठय़ा प्रमाणावर रुग्ण असून ते या जनुकांचे वाहक आहेत. या आजाराने ग्रस्त व्यक्तींना सातत्याने रक्त बदलण्याची गरज असते. यामुळे रुग्णाला उपचारासाठी मोठय़ा प्रमाणावर आर्थिक खर्च सोसावा लागतो. वाहक जनुकांचा प्रादुर्भाव असणाऱ्या दाम्पत्यास होणारे अपत्य थॅलेसेमियाग्रस्त असू शकते. वाहक जनुकांची चाचणी करून अशा दोन व्यक्तींचे विवाह टाळल्यास थॅलेसेमिया आजाराचा प्रसार रोखता येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यामध्ये सदर जनुकांचा प्रादुर्भाव नसल्याची चाचणी करून घेणे आवश्यक आहे.
या अनुषंगाने राष्ट्रीय दृष्टिकोनातून थॅलेसेमिया आजाराबाबत जनजागरणाकरिता विद्यापीठाच्या कुलपतींच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर, कुलसचिव डॉ. आदिनाथ सूर्यकर उपस्थित होते. यामध्ये विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये या आजाराची शक्यता तपासणीसाठी चाचणी घेण्याचे ठरविण्यात आले. यानुसार १२ हजार विद्यार्थ्यांची ‘होमोग्राम’ चाचणी करण्यात आली. या चाचणीतून ११७६ विद्यार्थी थॅलेसेमिया जनुक वाहक असण्याची शक्यता निदर्शनास आली. थॅलेसॅमिया जनुकांच्या वाहकतेची निश्चितता करण्यासाठी त्यांची ‘एचपीए-२’ ही चाचणी करण्यात आली. त्यापैकी २३० विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या चाचणीत ३४ विद्यार्थ्यांमध्ये थॅलेसेमिया वाहक जनुक असल्याचे निदान करण्यात आल्याची माहिती कुलसचिवांनी दिली आहे.