News Flash

भुयारी गटार योजनेस ३६५ कोटी मंजूर

शहरातील भुयारी गटार योजनेसाठी केंद्र सरकारकडून ३ अब्ज ६५ कोटी ६९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नागरी विकासमंत्री कमलनाथ यांनी तसे पत्र खासदार चंद्रकांत

| December 21, 2013 01:49 am

शहरातील भुयारी गटार योजनेसाठी केंद्र सरकारकडून ३ अब्ज ६५ कोटी ६९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नागरी विकासमंत्री कमलनाथ यांनी तसे पत्र खासदार चंद्रकांत खैरे यांना पाठविले आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना मंजूर करून घेण्यासाठी बरेच प्रयत्न केल्याचे खासदार खैरे यांनी सांगितले. शहर विकासासाठीची ही योजना मंजूर करण्यासाठी कमलनाथ व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा मोठा वाटा असल्याचे खैरे यांनी पत्रकार बठकीत सांगितले.
शहरातील गटारींची अवस्था अत्यंत वाईट आहे. सन १९८५ मध्ये केवळ २ ते ३ लाख लोकसंख्येसाठी केलेली ही योजना मोडकळीस आली असल्याने नवा प्रस्ताव सादर करण्यात आला. नागरी विकास विभागाच्या ‘यूडीआयएसएसएमटी’ योजनेतून ही रक्कम राज्य सरकारकडे पाठविण्यात यावी, असे आदेश कमलनाथ यांनी दिले आहेत. ही रक्कम तातडीने मिळेल. त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असा दावा करतानाच खैरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचा नारळ फुटेल, असे सांगितले.
नव्या योजनेतील प्रस्तावानुसार २६० किलोमीटर भुयारी गटार योजना होणार असून यात ६ मलशुद्धीकरण केंद्रे आहेत. अस्तित्वात असणारी शहराची लोकसंख्या व पुढील ३० वर्षांची अंदाजित लोकसंख्या गृहीत धरून केलेला प्रस्ताव मंजूर झाल्याने शहर विकासला चालना मिळेल, असे खैरे म्हणाले. या नंतर रस्त्यासाठीही याच योजनेतून निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेत नंतर कोणी बाधा आणू नये, म्हणून महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पत्रकार बठकीसाठी खैरे यांनी आवर्जून बोलविले होते. महापौर कला ओझा यांना कमलनाथ यांच्याकडून आलेले मंजुरी पत्रही खैरे यांनी सुपूर्द केले. उपमहापौर संजय जोशी, स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे, सुशील खेडकर, मीर हिदायत अली, जफर खान आदींची उपस्थिती होती.
लोकसभा निवडणुकीपूर्वी नवीन प्रकल्प मंजूर झाल्याने आनंद झाल्याचे खैरे यांनी सांगितले. महापालिकेत या मंजूर प्रकल्पाला आडकाठी होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थित नेत्यांनी केले. हा प्रकल्प मंजूर करून आणताना पाठपुरावा करताना समांतर योजनेसाठी मंजूर केलेला निधी परत द्या, अशी मागणी केंद्राच्या अधिकाऱ्याकडून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 1:49 am

Web Title: 365 crore sanctioned underground drain scheme
Next Stories
1 दूषित पाण्यामुळे लातुरातील ७० गावांचे आरोग्य धोक्यात!
2 स्थायी समिती सभापतिपदी काँग्रेसचे पवळे बिनविरोध
3 फरारी काशिनाथ पुयड अखेर शरण, विठ्ठल पुयडच्या मुसक्या आवळल्या!
Just Now!
X