नागपुरातील प्रस्तावित दोन्ही मेट्रो मार्गावर ३७ स्थानके असून सीताबर्डीवरील मुंजे चौकात दोन्ही मार्गाचे जंक्शन राहणार असल्याची माहिती दिल्ली मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे महाव्यवस्थापक अरुणकुमारसिंह यांनी दिली.
मेट्रो रेल्वेचे दोन मार्ग सध्या निश्चित करण्यात आले आहेत. कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौक, कामठी मार्ग, संविधान चौकापासून वर्धा मार्ग, व्हरायटी चौक, अभ्यंकर मार्ग, हंपियार्ड रोड, काँग्रेसनगर चौक, रहाटे कॉलनी चौक, वर्धा मार्ग, खामला मार्ग, विमानतळ व मिहान हा एक मार्ग आहे. या मार्गावर ऑटोमोटिव्ह चौक, नारी रोड, इंदोरा, कडबी चौक, गड्डीगोदाम चौक, कस्तुरचंद पार्क, झिरो माईल्स, सीताबर्डी, काँग्रेसनगर, रहाटे कॉलनी, नीरी, देवनगर, मयुरेश अपार्टमेंट, सहकारनगर, जुने विमानतळ, नवे विमानतळ, मिहान सिटी व मेट्रो डेपो असे एकूण १८ स्थानके राहतील. दुसरा मार्ग प्रजापतीनगर, सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू, पोद्दारेश्वर राम मंदिर चौक, रेल्वे स्थानक, मुंजे चौक, झाशी राणी चौक, उत्तर अंबाझरी मार्ग, हिंगणा मार्ग व लोकमान्यनगर आहे. या मार्गावर प्रजापतीनगर, वैष्णोदेवी चौक, आंबेडकर चौक, टेलिफोन एक्स्चेंज, चितार ओळी चौक, अग्रसेन चौक, मेयो रुग्णालय, नागपूर रेल्वे स्थानक, नेताजी मार्केट, झाशी राणी चौक, इन्स्टिटय़ुट ऑफ इंजिनिअर्स, बँक ऑफ इंडिया (शंकरनगर चौक), एलएडी चौक, धरमपेठ विज्ञान महाविद्यालय, सुभाषनगर, रचना अपार्टमेंट, वासुदेवनगर, बन्सीनगर व लोकमान्यनगर, असे एकूण १९ स्थानके राहतील. प्रत्येकी बारा डब्यांच्या तीन गाडय़ा येतील.
हिंगणा मार्ग परिसरात संरक्षण खात्याची तसेच उत्तर भागात अशा दोन जागा अधिग्रहित कराव्या लागतील. याआधी एल अँड टी व रेंबॉल्ड कंपनीने २००८ मध्ये नागपूर शहराचे सव्‍‌र्हेक्षण केले होते. तेव्हा चार मेट्रो मार्ग प्रस्तावित होते. या सव्‍‌र्हेक्षणानुसार नागपूर शहरातील लोकसंख्या सुमारे २५ लाख असून १२.३७ लाख वाहने आहेत. त्यापैकी १०.३२ टक्के दुचाकी आहेत. ६४.८१ टक्के लोक खाजगी वाहनांचा वापर करतात. ३३.७५ टक्के लोक दुचाकी वापरतात. ३१.१६ टक्के लोक कार वापरतात. मेट्रो सुरू झाल्यास २०१६ मध्ये सुमारे तीन लाख लोक मेट्रोने प्रवास करतील, असा अंदाज आहे. विमातळ परिसरात २०८६ हेक्टर जमीन एसईझेडसाठी राखीव असून त्यापैकी मिहानला १ हजार ४७२ हेक्टर जमीन देण्यात आली आहे. देशात एखाद्या प्रकल्पासाठी देण्यात आलेली ही सर्वाधिक जमीन आहे. शहरातून दहा टक्के प्रवासी मिहानला जाणारे असतील, असा अंदाज आहे.