एखाद्या देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा ठरवताना स्त्रियांचे राहणीमान आणि आरोग्य महत्त्वाचा निकष मानला जातो. भारतासारख्या देशात घरीच प्रसूती करणे यात नवीन नसले तरी आरोग्यविषयक जनजागृती आणि इतरही कारणांमुळे सुरक्षित प्रसूतीसाठी महिला रुग्णालयांत जायला लागल्या. मात्र, गेल्या तीन वर्षांत सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूतीनंतर ३८ बालकांचे मृत्यू झाल्याने सुरक्षित प्रसूती कशाला म्हणायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
 ‘मिलिनियम डेव्हलपमेंट गोल’ या २०००मधील संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतात माता आणि बालमृत्यू दर कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. माता मृत्यूदराच्या बाबतीत फारशी प्रगती नसली तरी बालमृत्यूदर कमी झाल्याचे या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते सांगतात. मात्र, उपराजधानीत गेल्या तीन वर्षांत तब्बल ३८ बालकांचे रुग्णालयातच मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. हे मृत्यू मेडिकल, डागा, खासगी आणि आयुर्वेदिक रुग्णालयात झाले आहेत. यासंदर्भात ‘माता व नवजात बालक’ या  विषयावर काम करणाऱ्या आम्ही आमच्या आरोग्यासाठीचे डॉ. सतीश गोगुलवार यांनी गरिबांना शासकीय रुग्णालयच परवडत असल्याने त्या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ आणि औषधांची मुबलकता असल्याची गरज व्यक्त केली. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचा ओघ त्या ठिकाणीच जास्त असल्याने आधीच्या रुग्णाला खाली ठेवून नवीन रुग्णाला खाटेवर ठेवले जाते. त्यामुळे जंतूसंसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. नागपुरात डागा, मेयो आणि मेडिकलच्या डॉक्टरांवर प्रचंड ताण असतो, हे विसरून चालणार नाही.  ‘मिलिनियम गोलनुसार’ मातामृत्यू दरात समाधानकारक प्रगती झालेली नसली तरी बालमृत्यू दर कमी झाला आहे.
रुग्णालयात प्रसूतीनंतर ज्यांचे बाळ दगावले त्यामध्ये अंतुजीनगरातील रुख्मिणी विश्वजीत मुंडुले, आंबेनगरची माधुरी सुनील सरोदे, ताजबागची मरिअल अब्दुल वशिम, पडोळेनगरातील रोहिणी देविदास घोंगे, भांडे प्लॉटची पुष्पा दिलानशेख पटेल, आझाद कॉलनी शाहीन परवीन अमजद खान, बजरंगनगरची विशाखा शशिकांत वाघमारे, मोठा ताजबागची साजेदा फिरदोस फिरोज कुरैशी, आंबेनगरची छाया गिरीधर बकल, कुंभारटोळीतील रेणुका राजेश चौधरी, वैष्णवीनगरची ललिता रवींद्र कुलरकर, भांडे प्लॉटची स्वाती विनोद डांगे, अंतुजीनगर भांडेवाडीचे पूजा उज्ज्वल वाघ, मोठा ताजाबागचे फौजिया बानो शेख फारुख, भांडेवाडीची दामिनी दिनेश बागडे, दुर्गानगरची सुष्मा दीपक शेंडे, वैष्णवदेवीनगर रेखा शेषराव सांगडीकर, गिरीजानगरच्या जयश्री युवराज वैद्य, मोठा ताजबाग रुक्सार रियाज अली, हनुमाननगर पूरण सुधाकर गणवीर, चांदमारीतील साहिलनगरची रोशनी रवी आकरे, भांडे प्लॉटची पायल तुळशीराम खेर, मोठा ताजबागच्या आशिया कौसर शेख, हनुमाननगरातील शहनाज लोकेश शेख, दुर्गानगरची पौर्णिमा गजानन भोले, वैष्णवीनगरची शालिनी धनराज सात्नुरकर, मोठा ताजबागची नाहोतबानो सय्यद रईस, भांडेप्लॉटची शालिनी गणेश उमरेडकर, भांडेप्लॉट नंदा रमेश पाटील, पडोळेनगरची अनसूया दिलीप बन्सोड, मोठा ताजबागची शहनाज तमजिल मोहंमद, पडोळेनगर वंदना प्रशांत गजभिये, मोठा ताजबाग शाईन जैनू खान, वैष्णवीनगर मीनाक्षी अमितराव ठमके, भांडेप्लॉट वंदना फुलचंद भोयर, आंबेनगर शारदा शिव पाल, गिरीजानगर प्रेमा सागर राऊत आणि हिवरीनगरची ममता योगेश वाघडे यांचा समावेश आहे.