शहरातील बहुचर्चित थत्ते मैदानाच्या मूळ मालकाला ३८ गुंठे जागा देऊन उर्वरित सुमारे अडीच एकर जागा नगरपालिकेच्या नावे हस्तांतरित करण्याचा ठराव पालिकेच्या गुरुवारी झालेल्या सभेत मंजूर करण्यात आला. या ठरावावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. जागेचा हा कोटय़वधी रुपयांचा गफला आहे. तसेच या व्यवहारात सेटलमेंट झाल्याचा आरोपही विरोधकांनी केला.
नगराध्यक्ष राजश्री ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर सभेला उपस्थित होते. थत्ते ग्राऊंड या ठिकाणच्या जागेवरून काही महिन्यांपूर्वी मोठा गदारोळ झाला होता. यात काही कोटींचा गफल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका भारती कांबळे व मंजुश्री मुरकुटे यांनी केला. पालिकेचे सूत्रधार जयंत ससाणे यांनी शासन दरबारी प्रयत्न करून जागेच्या आरक्षणात फेरबदल केला. मूळ मालकाला ३८ गुंठे जागा देऊन उर्वरित जागा पालिकेच्या नावे हस्तांतरित करण्याबाबत सरकारच्या पातळीवर निर्णय झाला. त्यानुसार आज पालिकेच्या सभेत या ठरावाला मंजुरी देण्यात आली.
नगरसेवक अंजुम शेख, मुजफ्फर शेख, शामिलग शिंदे, संजय फंड यांच्यासह विरोधी नगरसेविका भारती कांबळे, मंजुश्री मुरकुटे यांनी या विषयावरील चर्चेत भाग घेतला. आरक्षणात फेरबदल करण्याच्या निर्णयावर मुरकुटे व कांबळे यांनी टीका केली. थत्ते मैदानावरील आरक्षण पूर्णपणे उठलेले नाही, पण तेथे बांधकाम सुरू आहे. संरक्षक भिंत बांधली जात आहे. त्यावर कारवाई करा तसेच बुवा हलवाई यांनी मुख्य रस्त्यावर बेकायदा बांधकाम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. बांधकाम विभागाचे अभियंता सुतावणे यांनी बांधकामाला परवानगी दिली नाही अशी माहिती दिली. मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी चौकशी करून बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे सभेत सांगितले. नगरसेविका कांबळे यांनी सेटलमेंटचा आरोप केला तेव्हा त्यास सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतल्याने सभेत काही वेळ गोंधळ झाला.
साठवण तलाव, पोहण्याचा तलाव, वाचनालय या पालिकेच्या मालमत्तेचे देखभालीसाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची निविदा काढण्यात आली असून, लवकरच या ठिकाणी कॅमेरे बसवू असे मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले. प्रवरा डावा कालव्याजवळील गिरमे कॅनॉल पूल ते बेलापूर कॅनॉल पूलापर्यंत १५० मीटर लांबीचा कालवा बंदिस्त करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर येथे कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.
थत्ते मैदानचे प्रकरण
थत्ते मैदान येथील आरक्षण उठविण्याचा निर्णय सूत्रधार ससाणे यांनीच घेतला. थत्ते मैदानावर ९७ गुंठय़ांचे आरक्षण होते. पण जागा मोजली असता ती १४२ गुंठे भरली. प्रांताधिकारी गीतांजली बावीस्कर यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. ती अपूर्ण असल्याने अजूनही जादा जागेचा मालक कोण हे स्पष्ट झालेले नाही. आता आरक्षण उठवल्याने काहींचा मोठा फायदा होणार आहे. या ठिकाणी गुंठय़ाला २० लाख रुपये बाजारभाव आहे. एकूणच हे प्रकरण वादग्रस्त बनले आहे. पालिकेला मोफत जागा देण्याचे औदार्य व आरक्षण उठविण्याचा निर्णय हा शहराच्या हिताचा नसून त्यात काही राजकारण्यांचे हितसंबंध गुंतले आहे असे बोलले जाते.