कीटकनजन्य रोगप्रतिरोध म्हणून जून महिना पाळला जातो. हिवतापाचा आजार एॅनाफिलीस या विशिष्ट जातीच्या डासांपासून पसरतो. या डासासंबंधी जिल्ह्य़ातील कळंब, राळेगाव, यवतमाळ, पुसद, उमरखेड व घाटंजी या तालुक्यातील ३८ गावे अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
कीटकजन्य रोगनियंत्रक कार्यक्रम १ ते ३० जूनदरम्यान राबविला जाणार आहे. रुग्णांना हिवतापाची लागण होऊ नये, याकरिता हिवताप विभागाकडून गृह उपचार दिले जाणार आहेत. रक्ताचा नमुना घेऊन उपचाराची जबाबदारी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राची राहणार असून तशी व्यवस्था तेथे करण्यात आली आहे.
याशिवाय, नागरिकांना क्लोरिक्विन गोळ्यांचा डोज वयोमानानुसार दिला जाणार आहे. वैद्यकीय तपासणीत तापाचे निदान होऊन जंतू आढळल्यास संपूर्ण उपचाराची जबाबदारी हिवताप विभागाकडे राहणार आहे. हिवतापाच्या आजाराची लागण होऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
पाणी साठविण्यासाठी रांजण, टाके दररोज स्वच्छ करणे, किमान एक दिवस कोरडा पाळणे, सांडपाणी साचू न देणे, पाणी साचलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे, अशा अनेक उपाययोजना हिवताप विभागाने सुचविल्या आहेत. प्रत्येक गावात अल्फासायफ्रोमेथीनची फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी एस.एम. तरोडेकर यांनी दिली. यावेळी जिल्हा उपआरोग्य अधिकारी डॉ.धम्रेश यांची उपस्थित होती.