जिल्हा परिषद अंतर्गत पशुवैद्यकीय विभागात तब्बल ३९ पदे रिक्त असल्याने एकाच पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे २-३ अधिकाऱ्यांचा पदभार सोपवून कामकाज केले जात आहे. रिक्त पदांच्या अतिरिक्त भारामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाला वेळेवर आरोग्य सेवा देताना यंत्रणेची चांगलीच दमछाक होत आहे. रिक्त पदे तत्काळ भरावीत, यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा होत असला, तरी सरकारकडून मात्र प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत पशुवैद्यकीय सेवेसाठी जिल्ह्य़ात वर्ग १ चे ५७, तर वर्ग ३ चे ८४ दवाखाने आहेत. जिल्ह्य़ातील शेती प्रामुख्याने कोरडवाहू असल्याने शेतकरी पशुपालनाकडे वळला आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला हा जोडधंदा, दूधउत्पादनामुळे ग्रामीण अर्थकारणाला बळकटी देणारा ठरला आहे. जिल्ह्य़ात या वर्षीच्या पशुगणनेनुसार ८ लाख २५ हजार ४३४ पशुधन आहे. पशुधनाला आरोग्यसेवा मिळण्यासाठी गावपातळीवर दवाखाने असले तरी रिक्त पदांमुळे प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.
सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यासह ४ विस्तार अधिकारी, २१ पशुवैद्यकीय अधिकारी, १७ पशु पर्यवेक्षकांच्या जागा रिक्त आहेत. परिणामी दोन वा तीन दवाखान्यांचा पदभार एकाच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर सोपवून कामकाज चालवावे लागते.