दुबईवरून बंदरात दाखल झालेला अल्युमिनियमचा माल कंटेनर चालकाने संबंधित कंपनीला न पोहोचवता त्याचे अपहार केल्याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हय़ाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोठय़ा शिताफीने कंटेनर चालकाला अटक केली आहे. हिंद टर्मिनल या गोदामातून सदरचा माल कंटेनरमधून सिल्व्हासा येथील रेसिटंड अ‍ॅण्ड अ‍ॅलाइड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे पाठविण्यात आला होता. यात १८ लाख ८० हजार रुपये किमतीचा अ‍ॅल्युमिनियमचा माल होता. त्या कंटेनरचा चालकानेच हा माल सिल्व्हासा येथील कंपनीत न नेता मालाचा अपहार करून तो विकण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी उरण पोलिसांत गुन्हा दाखल केला असता उरण पोलिसांकडे केवळ चालकाचा मोबाइल नंबर होता. या मोबाइलच्या साहाय्याने उरण पोलिसांनी तपास करीत या गुन्ह्य़ातील चार जणांना अटक केली असून त्यांच्या तीन साथीदारांचा शोध सुरू आहे.
माल घेऊन सिल्व्हासाकडे निघालेल्या कंटेनर चालकाने आपल्या कंटेनर वाहनाची नंबर प्लेट बदलून दुसऱ्याच क्रमांकाची नंबर प्लेट लावल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या संदर्भात माल मागविणाऱ्या कंपनीने ऑक्टोबर महिन्यात आपल्या कंपनीचा माल घेऊन येणारा कंटेनर गायब झाल्याची तक्रार उरण पोलिसांत केली होती. याचा तपास करीत असताना उरण पोलिसांकडे कोणतीच माहिती नव्हती.
ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत हा माल पाठविण्यात आलेला होता. त्यांच्याकडे चालकाच्या मोबाइल क्रमांकाशिवाय कोणतीच माहिती नव्हती. मात्र उरण पोलिसांनी चालकाच्या मोबाइलच्या आधारावर या गुन्ह्य़ातील आरोपींना अटक केली असून या प्रकरणी रमेशकुमार चौधरी, विराज सिंह, शिवाजीराव भोसले व निवृत्ती पंढरी चोपडे या चौघांना अटक केली असून कंटेनरसह मुद्देमालही हस्तगत केला असला तरी वाहनचालक वर्मा तसेच त्याचे दोन साथीदार अमिन नायक व नितीन भास्कर गव्हाळे या तिघा जणांचा शोध सुरू असल्याची उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी दिली आहे, तर या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात करीत आहेत.