केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढाकारातून सोलापुरात उभारण्यात येत असलेल्या एशियाटिक टेक्स्टाईल पार्क प्रकल्पासाठी केंद्र सरकारने चार कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती प्रकल्पाचे प्रमुख अनिल पल्ली यांनी सांगितली.
या एशियाटिक टेक्स्टाईल पार्क प्रकल्पाची किंमत ३३० कोटींची आहे. त्यापैकी १०१ कोटी खर्च करून विविध पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या प्रकल्पात दोन सूतगिरण्यांसह दोन डाईंग युनिट, दोन प्रोसेसिंग युनिट व इतर मिळून ८४ अत्याधुनिक यंत्रमाग कारखाने उभारले जाणार आहेत. हे टेक्स्टाईल पार्क केंद्र सरकारकडून मंजूर करून घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी महत्त्वाचा पुढाकार घेतला होता.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सुमारे तीन हजार ५०० जणांना रोजगार मिळणार आहे. तर तीन हजार व्यक्तींना अप्रत्यक्ष रोजगार मिळू शकेल, असे अनिल पल्ली यांनी नमूद केले. देशात २४ टेक्स्टाईल पार्क मंजूर झाले असून, त्यात सोलापूरचाही समावेश झाल्याने येथील वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था प्राप्त होईल, असा विश्वास पल्ली यांनी व्यक्त केला.