सोलापूर जिल्ह्य़ात पाणी टंचाईची तीव्रता वरचे वर वाढत चालली असून या भीषण दुष्काळी परिस्थितीत स्वत:च्या अस्तित्वासाठी मुक्या वन्यप्राण्यांनाही संघर्ष करावा लागत आहे. यात पंढरपूर तालुक्यातील बार्डीसारख्या भागात वनात पाण्याचा शोध घेत भटकणाऱ्या चार वनगायींचा फळबागांवरील फवारणीचे विषारी औषध प्यायल्याने मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी वनविभाग बेदखल असल्याचे दिसून येते.
चारा-पाण्याअभावी जिल्ह्य़ातील वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याबाबत ओरड होत असताना वनविभागाने वन्यप्राण्यांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. प्रत्यक्षात अद्याप कार्यवाही होताना दिसून येत नाही.
पंढरपूर तालुक्यातील बार्डी येथील वनात ४८ वनगायी होत्या. परंतु तीव्र पाणीटंचाईमुळे पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या चार वनगायी एका शेतकऱ्याच्या फळबागेतील फवारणीचे औषध पाणी समजून प्यायल्याने त्यांचा मृत्यू झाला. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा आदी तालुक्यांमध्ये हरणांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. परंतु सध्याच्या भीषण दुष्काळात माणसालाच पाणी मिळणे मुश्किलीचे झाले असताना मुक्या वन्यप्राण्यांना पाणी कोठून मिळणार, हा प्रश्न सतावत आहे.