मार्च महिना सरत असताना सोलापुरात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियस पार करून पुढे सरकला आहे. त्यामुळे उष्णतेने आबालवृध्द नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक शक्यतो सकाळीच कामे आटोपून घेत आहेत किंवा दुपारच्या उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी सायंकाळी घराबाहेर पडत आहेत.
मार्चच्या पहिल्या आठवडय़ात ३५ अंश सेल्सियस एवढे तापमान होते. नंतर त्यात तिसऱ्या आठवडय़ात वाढ होऊन हा पारा ३८, ३९ अंशापर्यंत चढत गेला. काल दोन दिवसांपासून पारा ४० अंशाच्या घरात गेल्याने उष्णतेची धग असह्य़ झाली असतानाच काल मंगळवारी तामपानाचा पारा ४०.२ आणि दुसऱ्या दिवशी, बुधवारी तो त्यापुढे सरकत ४०.६ अंशापर्यत गेला. यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने उच्चांक गाठल्याचे दिसून येते. सध्या वातावरणात बाष्पीभवनाचे प्रमाण कमी असल्याने उष्णता येत्या काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
वाढत्या तापमानामुळे दुपारच्या कडक उन्हात घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. उष्म्याच्या त्रासामुळे चक्कर येऊन नागिरक कोसळण्याच्या घटना घडत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावरील टोपी, मोठे रूमाल, डोळ्यावर काळे गॉगल वापरण्याचे प्रमाण वाढले आहे.  उन्हाळा सुसह्य़ करण्यासाठी शीतपेयांचा वापर होताना दिसत आहे. तर, घरात पंखे काम करेनासे झाल्याने थंड हवेसाठी कूलर्स बाहेर काढले जात आहेत.