वाढती महागाई आणि पर्यावरणाविषयी निर्माण झालेली जागरुकता यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून फटाक्यांच्या विक्रीत घट होत आहे. यावर्षी दिवाळीतच निवडणुकीचे निकाल लागल्याने त्यात किंचीत वाढ झाली आहे. दिवाळीच्या काही दिवसांत शहरात ४० कोटी रुपयांच्या फटाक्यांची विक्री होईल, असा अंदाज शहरातील फटाक्यांच्या ठोक विक्रेत्यांनी वर्तवला आहे. दरम्यान, दरवर्षीपेक्षा यावर्षी कमी फटाके फुटावे, असा प्रयत्न पर्यावरणवाद्यांनी चालवला आहे.
शहरातील पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करणाऱ्या विविध संघटना गेल्या काही वर्षांपासून ‘ग्रीन दिवाळी’ ही संकल्पना राबवत आहे. त्यासाठी प्रचारही जोरात केला जात आहे. यामुळे फटाके फोडण्याविषयी नागरिकांमध्ये अनास्था निर्माण झाली. विशेषत: त्याचा परिणाम शाळकरी मुलांवर अधिक प्रमाणात होत आहे. त्यातच महागाईचा परिणामही फटाके विक्रीवर झाला. प्राप्त होणाऱ्या मिळकतीतून घर खर्च करावा की फटाके विकत घ्यावे, असा प्रश्न मध्यमवर्गीयांमध्ये निर्माण झाला. त्यामुळे दरवर्षी मध्यमवर्गीय फटाके खरेदीला कात्री लावत आहे. दोन वर्षांपूर्वी नागपूरच्या ठोक बाजारात ६० कोटींची फटाक्यांची विक्री झाली होती. गेल्यावर्षी ती घटून ३० कोटींवर आली. तर यावर्षी निवडणुकीमुळे त्यात वाढ होऊन ती ४० कोटींवर जाऊन पोहचली असल्याची माहिती नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.  
अग्रवाल म्हणाले, यावर्षी फटाक्यांच्या किंमतीत दहा टक्के वाढ झाली आहे. प्रदूषण कमी होईल, असे फटाके तयार केले जात आहे. त्यामुळे प्रदूषण न करणारे फटाके फोटून आनंद लुटता येऊ शकतो. भारताने चीनच्या फटाक्यावर बंदी घातली असल्याने काही प्रमाणात र्निबध आले आहे. तरीही शिवकाशी, काशी येथील फटाके शहरात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. दिवाळीच्या दिवसांत संपूर्ण विदर्भात २०० कोटी रुपयांच्या फटाक्यांची विक्री होत असावी, असेही त्यांनी सांगितले.
फटाके विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ. रवींद्र भुसारी म्हणाले, फटाक्यांपासून मानवी जीवनावर व पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत यावर्षी समाजात जनजागृती करण्यात आली. त्याचे परिणाम चांगले दिसून येत आहे. फटाक्यांवरील खर्च हा अनाठायी आहे, असे आता नागरिकांना समजू लागले आहे. दरवर्षी हजार रुपयाचे फटाके खरेदी करणारे आता फक्त पाचशे व त्याहीपेक्षा कमी रुपयांचे फटाके विकत घेतात. काही फटाक्यांवर होणारा खर्च अन्य चांगल्या कार्यात खर्च करतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे अभियान राबवले जात आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागल्याचेही भुसारी यांनी स्पष्ट केले. यावर्षी निवडणुकीमुळे फटाक्यांच्या विक्रीत वाढ झाल्याने पर्यावरणवादी चिंता व्यक्त करीत आहेत.
इकडे पर्यावरणवादी फटाक्यांपासून होणाऱ्या दुष्परिणामाचा प्रचार-प्रसार करत असल्याने त्याचा परिणाम फटाके विक्रीवर होत आहे. विक्रीत घट होत असल्याने शहरातील व्यापारी मात्र चिडले आहेत. यावर्षी दिवाळी २३ ऑक्टोबरला असली तरी विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजनी १९ ऑक्टोबरला झाली. त्यामुळे विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी निकाल लागल्यानंतरच लाखो रुपये किंमतीचे फटाके फोडून चार दिवसांआधीच दिवाळी साजरी केली. यानंतरही दिवाळीलाही फटाके फुटणारच आहे. एकीकडे फटाक्यांची विक्री जास्तीत जास्त व्हावी, असा प्रयत्न चालवला जात असतानाच पर्यायवरणवादी मात्र त्याला अडथळे आणण्याचे काम करत आहेत. फटाक्यांमध्ये कॉर्बन मॅग्नीज, सल्फर, यासारख्या रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे शारीरिक विकार बळावतात. याची जाणीव होऊ लागल्याने सामान्य नागरिकही फटाक्यांपासून दोन हात दूरच राहात आहेत.

मोकळ्या मैदानात फटाके फोडावे
दाट वस्तीत फटाके फोडण्यापेक्षा मोकळ्या मैदानात येऊन फटाके फोडावेत. त्यासाठी प्रशासनाने मैदान उपलब्ध करून द्यावे. इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. रात्री १० वाजल्यानंतर फटाके फोडू नये, असा नियम आहे. असे असतानाही मोठय़ा आवाजाचे फटाके फोडले जातात. पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने मोठय़ा आवाजाचे फटाके फोडले जाऊ नयेत, यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही एक चांगली सुरुवात आहे. मोठे आवाज करणारे फटाके फोडणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी.  रवींद्र भुसारी, फटाके विरोधी अभियानाचे संयोजक.