शहरातील पंचवटी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आ. अ‍ॅड्. उत्तम ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत ४० जणांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिक्षकांना अध्यापनाशिवाय शाळाबाह्य़ कामे सरकारने देऊ नयेत. त्यांच्यावरील जादा कामाचा बोजा काढल्याशिवाय शिक्षकाला दर्जेदार शिक्षण देता येणार नाही, असे आ. ढिकले यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. के. मुखेडकर  होते. या प्रसंगी राजाभाऊ ढोकळे, प्रा. डॉ. शांताराम रायते, कार्यवाह नथुजी देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. हिरालाल परदेशी यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान, श्री साईबाबा हार्ट इन्स्टिटय़ूट आणि रिसर्च सेंटर व अभिजीत मेमोरियल फाऊंडेशन यांच्या वतीने शिक्षक सप्ताहांतर्गत ४५० शिक्षकांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली. ईसीजी, रक्त शर्करा, रक्तदाब या तपासण्या करण्यात आल्या. सप्ताहाच्या समारोप प्रसंगी डॉ. मानसी पानट यांचे ‘पाढे आणि वर्गाची जादू’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. अतुल पाटील यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शनात निरोगी व तणावमुक्त जीवन कसे जगता येईल याबाबत माहिती दिली. आहारात फास्टफुड, तेलकट, अतिगोड व मांसाहार यांचे सेवन कमी प्रमाणात करावे. शारीरिक व्यायाम व योगासने केल्यास प्रकृती उत्तम राहते असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. डॉ. शिवानी साबळे यांनी सूत्रसंचालन केले.
वावरे महाविद्यालयात व्याख्यान
सिडको येथील कर्मवीर शांतारामबापू वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शिक्षक दिनी प्राचार्य डॉ. किशोर पवार यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे स्वतंत्र भारताबद्दलचे योगदान, त्यांचे कार्य, शिक्षक दिनाचे महत्त्व याविषयी विचार मांडले. गुणवंत विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. एस. टी. घुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. के. एम. खालकर यांनी आभार मानले.