लॅक्टोस पावडरचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, तसेच पोलिसांनी मुळेवाडी येथील दूध संकलन केंद्रावर संयुक्त कारवाई करुन ४०० लिटर भेसळयुक्त दूध व पावडर जप्त केली. या प्रकरणी एकास अटक केली. अडीच वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या साखळीचा पोलिसांनी भंडाफोड केला होता. त्यानंतर पुन्हा भेसळीचा गोरखधंदा सुरू झाल्याचे चित्र या कारवाईने समोर आले आहे.
आष्टी तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर दूध संकलन केले जाते. गावागावांतून शासकीय व खासगी संकलन केंद्रांतून दूध मोठय़ा प्रमाणात बाहेर पाठवले जाते. दौलावडगावजवळील मुळेवाडी येथील शिवशक्ती संकलन केंद्रावर भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासन सुरक्षा अधिकारी एस. बी. तेरकर यांना मिळाली. त्या आधारे अंभोरा पोलिसांची मदत घेत ही कारवाई करण्यात आली. शिवाजी शहाराम मुळे याला ताब्यात घेण्यात आले.