विदर्भातील चार अभियांत्रिकी आणि बिझनेस मॅनेजमेंट संस्थांमधील प्रवेशसंख्या यंदाच्या शैक्षणिक सत्रात ४०५ ने कमी झाली असून, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने प्रवेश संख्येत घट करण्यास मान्यता दिल्यानंतर राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. विद्यार्थी संख्या रोडावल्याने या महाविद्यालयांवर ही वेळ आली आहे. मात्र, त्याच वेळी यंदापासूनच विदर्भातील दोन महाविद्यालयांना ४५८ जागा वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे, हे विशेष.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे नवीन प्रवेशसंख्या जाहीर केली आहे. विदर्भातील दोन अभियांत्रिकी महाविद्यालयांना नवीन अभ्यासक्रमांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी १०८ जागांवर प्रवेश देण्याची मुभा मिळाली आहे. दोन महाविद्यालयांनी प्रवेशसंख्या वाढवून मागितली होती. त्यात या महाविद्यालयांना ४५८ जागा मिळाल्या आहेत. चार महाविद्यालयांना मात्र प्रवेशसंख्येत घट करावी लागली, असे विपरित चित्र पुढे आले आहे. प्रवेश संख्येत झालेली घट बहुतांश पश्चिम विदर्भातील आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विदर्भात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली.
१९७८ मध्ये राज्यात केवळ १६ अभियांत्रिकी महाविद्यालये होती. पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशसंख्या केवळ २ हजार ६४२ इतकी मर्यादित होती. २००० पर्यंत राज्यात १२९ अभियांत्रिकी महाविद्यालयांची स्थापना झाली आणि विद्यार्थ्यांची संख्याही ३८ हजार ९३९ पर्यंत वाढली. २०१२ मध्ये राज्यातील ३६४ महाविद्यालयांची प्रवेश संख्या ही १ लाख ४८ हजार ८४ पर्यंत पोहोचली आहे. विद्यार्थ्यांचा कल पाहून अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या काही अभियांत्रिकी महाविद्यालयांनी विद्यार्थी टिकवून ठेवण्याची किमया साधली खरी, पण अनेक महाविद्यालयांना ते जमेनासे झाले आहे. एमबीए अभ्यासक्रम शिकवणाऱ्या काही महाविद्यालयांनाही उतरती कळा आली आहे.  
 विदर्भातील सन्मती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (वाशीम), माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुट्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (शेगाव), सिध्दिविनायक स्कूल ऑफ इंजिनिअरिंग (बुलढाणा) आणि सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (नागपूर) या महाविद्यालयांवर प्रवेशसंख्या ४०८ ने कमी करण्याची वेळ आली आहे. सन्मती कॉलेजला मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर सायन्स आणि सिव्हिल शाखांची प्रवेशसंख्या प्रत्येकी ३० ने कमी करावी लागली आहे. माऊली ग्रूप ऑफ  इन्स्टिटय़ूटला मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमांची प्रवेश संख्या ७५ ने कमी करावी लागली आहे. सिद्धिविनायक स्कूललाही प्रवेश संख्या १२० ने कमी करावी लागली आहे.
सेंट्रल इन्स्टिटय़ूटला एमबीएच्या दोन तुकडय़ांमध्ये ३० जागा कमी कराव्या लागल्या आहेत. दुसरीकडे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला (नागपूर) विविध अभ्यासक्रमांसाठी ३३० प्रवेश संख्या वाढवून मिळाली आहे. बल्लारपूर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (बामनी, चंद्रपूर) मध्ये १२० जागा वाढल्या आहेत. याशिवाय, सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला (अमरावती) सिव्हिलच्या ६०, जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला (यवतमाळ) इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन पदवी, तसेच पदव्युत्तर आणि मॅकेनिकल (सीएडी/ सीएएम) अभ्यासक्रमासाठी ६०, २४ आणि २४ अशा प्रवेश क्षमतेला मंजुरी मिळाली आहे. याच वर्षांपासून हे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.