शिवसेनेची कोणाशीही स्पर्धा नाही. आमची स्पर्धा आमच्याशीच आहे, असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार सुभाष देसाई यांनी येथे व्यक्त केले. शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी ‘प्रतिज्ञा सभा’ आयोजित करण्यात आली आहे. मोदी यांच्या सभेशी स्पर्धा म्हणून ही सभा भव्यदिव्य केली जात असल्याची टीका माध्यमांतून होत आहे. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी देसाई यांनी हा खुलासा केला. सभेच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. औरंगाबाद येथून ४० हजार शिवसैनिक मुंबईत येतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र रेल्वेही सोडण्याचा प्रयत्न होणार आहे.
शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित बैठकीस संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार किशनचंद तनवाणी आदींची उपस्थिती होती. ‘नोटां’चा काँग्रेसवाले पूर्वी निवडणुकीत उपयोग करीत. पण आता आलेल्या नवीन ‘नोटा’चा उपयोग काय, असा सवाल देसाई यांनी केला. निवडणूक निर्णयावर उमेदवार नापसंतीच्या ‘नोटा’चा परिणाम होणार नसेल तर तो ठेवायचा कशाला, याचा उलगडा व्हायला हवा, असे मत नोंदविताना येत्या काळात निवडणुकीची तयारी करताना त्यात होणाऱ्या बदलांकडेही कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी बूथप्रमुखांबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनाही प्रशिक्षण दिले जाईल. या बरोबरच निवडणुकांच्या तयारीचा संकल्प करण्यास शिवसेनाप्रमुखांची जयंती ‘प्रतिज्ञा दिन’ म्हणून साजरी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हाप्रमुख दानवे यांनी प्रास्ताविक, तर राजू वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.

‘पूर्वी स्कूटरवरून प्रचार,
आता १० गाडय़ांचे धनी!’
खासदार खैरे यांनीही शिवसैनिकांना जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. हे आवाहन करताना त्यांनी शिवसेनेची वाटचालही सांगितली. जिल्ह्य़ात शिवसैनिकांकडे आता हजारावर गाडय़ा आहेत. यातील काही ‘फॉच्र्युनर’, तर काही ‘स्कोडा’ आहेत. माझ्याकडे १० गाडय़ा आहेत. कारण शिवसेनाप्रमुखांनी आपले जीवनच बदलून टाकले आहे. पूर्वी देसाईसाहेब प्रचाराला येत, तेव्हा आम्हाला गाडीसुद्धा नसायची. मी स्वत: स्कूटरवर प्रचार केला. एखाद्या मित्राला गाडी मागितली तर तो द्यायचा नाही. आता गाडय़ा वाढल्या. शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला २३ जानेवारीला मुंबईला जाण्यासाठी पहाटे ४ वाजता उठावे लागले तर काय हरकत आहे, असा सवाल खैरे यांनी केला.