राज्य विज्ञान शिक्षण संस्था, जिल्हा परिषद आणि विज्ञान अध्यापक संघ यांच्यातर्फे २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ४० वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन क. का. वाघ शिक्षण संस्थेत करण्यात आले आहे.
या बाबतची माहिती क. का. वाघ संस्थेचे सचिव के. एस. बंदी यांनी पत्रकार परिषदेत दिली. विज्ञान प्रदर्शनासाठी जिल्हा परिषद निधीतून चार लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यंदा कृषी, ऊर्जा, आरोग्य, पर्यावरण आणि संसाधने या विषयावर विद्यार्थ्यांकडून प्रकल्प सादर केले जातील. प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांच्या हस्ते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर, शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वैज्ञानिक विचारांचा प्रसार होण्याच्या दृष्टीने संस्थेच्यावतीने ‘दिशा मांगल्याच्या’ या स्मरणिकेचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
प्रदर्शनात जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, महानगरपालिका शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, मिशनरी आदी शाळा सहभागी होणार आहेत. यासाठी इयत्ता पहिली ते आठवी तसेच नववी ते बारावी असे दोन गट करण्यात आल्याचे बंदी यांनी सांगितले. निवड प्रक्रियेंतर्गत आदिवासी भाग असलेल्या तालुक्यातून प्राथमिक स्तरापर्यंतच्या गटातून चार, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून चार अशी एकुण आठ प्रदर्शनीय वस्तु आणि बिगर आदिवासी तालुक्यातून प्राथमिक स्तरावर तीन, माध्यमिक स्तरावर तीन अशा सहा प्रदर्शनीय वस्तुंची मूल्यमापनाच्या निकषानुसार प्रदर्शनासाठी निवड करण्यात आल्याचे अध्यापक विद्यालयाचे प्रा. बी. व्ही. कर्डिले यांनी सांगितले. या प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यातून ६४ वैज्ञानिक प्रकल्पांसह १२८ विद्यार्थी सहभाग नोंदवित आहेत तर बिगर आदिवासी तालुक्यांतून ४८ वैज्ञानिक प्रकल्पांसह ९६ विद्यार्थी सहभागी होत आहेत. तसेच तालुका स्तरावरून अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्यासाठी प्राथमिक स्तरावर १६ व माध्यमिक विभागातून १६ विभागातून शिक्षक सहभाग नोंदवितील. तालुकास्तरावरून १६ प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर निर्मित वैज्ञानिक साधनासह सहभागी होणार आहेत. या शिवाय लोकसंख्या शिक्षण प्रदर्शनासाठी तालुक्यातून प्राथमिक तसेच माध्यमिक गटातून ३२ शिक्षक सहभागी होणार आहेत. व्यवसाय मार्गदर्शन प्रदर्शनासाठी स्वतंत्र दालनाची निर्मिती करण्यात आली आहे. शिक्षक, विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन बंदी यांनी केले आहे.