अंबरनाथ शहराच्या स्वच्छतेसाठीचा ४२१ कोटी रुपयांचा शहर स्वच्छता आराखडा तयार करण्यात आला असून अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने हा आराखडा अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्याकडे बुधवारी सुपूर्द करण्यात आला. राज्यातील १५ ‘अ’ वर्ग पालिकांपैकी अंबरनाथ पालिकेचा पहिला आराखडा सादर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यातील ‘अ’ वर्ग नगरपरिषदांचा शहर स्वच्छता आराखडा तयार करण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेच्या एस. एन. पाटणकर, कल्याण केळकर, शुभांगी सोहोनी यांनी हा आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ास कार्यबल समितीचे अध्यक्ष असलेल्या नगराध्यक्षांनी पसंती दिली. शहर स्वच्छता आराखडा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो राज्य शासनाकडे व पुढे केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. केंद्राने मंजुरी दिल्यानंतर टप्प्याटप्प्याने शासनाकडून या कामांसाठी अनुदान प्राप्त होणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. सार्वजनिक शौचालय, भुयारी गटार योजना पुनर्बाधणी, पाणीपुरवठा, सिमेंट काँक्रीटीकरण, पथदिवे, नागरी घनकचरा व्यवस्थापन, शालेय स्वच्छता व सुधारणा या घटकांचा यात समावेश करण्यात आला आहे.