राज्य शासनाने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या वीज देयक सवलतीचा लाभ नाशिक परिमंडलातील जवळपास ४३ हजार ६३५ शेतकऱ्यांना झाला आहे. त्यांची ७३६ लाख रुपयांची देयके माफ करण्यात आली आहेत. जे कृषीपंपधारक शेतकरी गारपीटग्रस्त नाहीत, त्यांनी त्यांची वीज देयके नियमितपणे भरावीत, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.
राज्य शासनाने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना जानेवारी ते जून २०१४ या कालावधीतील वीज देयकात सवलत जाहीर केली होती. त्यानुसार नाशिक परिमंडलातील जवळपास ४३ हजार ६३५ शेतकऱ्यांना वीज देयक माफीचा लाभ मिळालेला आहे. त्यांची उपरोक्त कालावधीतील ७३६ लाखाची वीज देयके राज्य शासनाने माफ केली आहेत. नाशिक परिमंडलांतर्गत नाशिक जिल्ह्यातील २९ हजार ६८८ शेतकऱ्यांची वीज देयके राज्य शासनाने माफ केली आहेत. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील १३ हजार ९४७ शेतकऱ्यांना या माफीचा लाभ मिळाला आहे. या जिल्ह्यातील २२१.६२ लाखाची राज्य शासनाने माफ केली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या गारपीटग्रस्तांच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना या सवलतीचा लाभ मिळाला आहे. तसेच उर्वरित कृषीपंपधारकांना त्यांची नियमित देयके वितरित करण्यात आलेली आहेत. कृषीपंपधारकांनी चालू व थकीत देयके भरून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.