सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात संततधार सुरू असली तरी त्याचा जोर काहिसा कमी झाला. यामुळे धरणांमधील विसर्गाचे प्रमाण शुक्रवारी कमी करण्यात आले. मागील चोवीस तासात जिल्ह्यात ४३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परंतु, यापूर्वी प्रतीक्षेत राहिलेल्या बागलाण, दिंडोरी तालुक्यात त्याने दमदार हजेरी लावली. या दिवशी गंगापूर धरणातील विसर्ग कमी होऊन ५०१७ तर दारणातील ७६७६ क्युसेक्सवर आला. पावसाचा अंदाज घेऊन पाणी सोडण्याबाबत नियोजन केले जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात चार तालुक्यात पावसाचा जोर कायम असला तरी उर्वरीत तालुक्यांमध्ये मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी तो जोर पकडण्याच्या मार्गावर असताना दुसऱ्या दिवशी हे प्रमाण कमी झाले. मागील चोवीस तासात जिल्ह्यात ४३३ मिलीमीटर पाऊस झाला. त्याच नेहमीप्रमाणे इगतपुरी तालुका आघाडीवर राहिला. या ठिकाणी ६४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्र्यंबकेश्वर ५७, पेठ ३७, सुरगाणा २४.८ मिलीमीटर या भागात त्र्यंबकेश्वर वगळता पावसाचा जोर काहिसा कमी झाला. यापूर्वी जिल्ह्यातील ज्या भागात दमदार पाऊस कोसळला नाही, त्यातील काही तालुक्यात त्याने दमदार हजेरी लावली. दिंडोरी व बागलाण तालुक्यात अनुक्रमे ५४.२ व ४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच नाशिक २२.६, मालेगाव १८, नांदगाव १६, चांदवड २३.२, कळवण १७.६, कळवण १७.६, देवळा १७.२, निफाड १२.८, सिन्नर १७ व येवल्यात २३ मिलीमीटर पाऊस झाल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
पावसाचा जोर काहिसा कमी झाल्यामुळे पाटबंधारे विभागाने धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण कमी केले. गंगापूरमधून आदल्या दिवशी सोडण्यात आलेले ७ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग दुसऱ्या दिवशी दोन हजारने कमी झाला. शुक्रवारी या धरणातून ५०१७ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. तसेच दारणा धरणाचाही विसर्ग तीन हजाराने कमी होऊन ७६७६ क्युसेक्सवर आला आहे. भावली धरणातून ५८६, वालदेवी १५७९, कडवा ३२२० तर नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून २२,३१४ क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. इतर धरणांच्या जलसाठय़ातही वाढ होण्याची प्रक्रिया सुरू आहे. गंगापूर ४६६६ (८३), काश्यपी धरणात १०१० (५५), गौतमी-गोदावरी १११७ (५९), पालखेड ७५० (१००), करंजवण ३००८ (५६), वाघाड २१३४ (८५), ओझरखेड ३७४ (१८), पुणेगाव ३६७ (१८), भावली १४३४ (१००), मुकणे ३०८६ (४३), वालदेवी ११३३ (१००), कडवा १३३९ (७२), आळंदी ९२१ (९५), भोजापूर १६६ (४६), चणकापूर १४७७ (५४), पुनद ६२७ (४५), हरणबारी १११४ (९६), केळझर ३०४ (५३), गिरणा १२८१ (७) जलसाठा झाला आहे.

तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
तापी नदीला पूर आल्यामुळे शिरपूर तालुक्यातील ५७ व शिंदखेडा तालुक्यातील २८ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आल्यामुळे पुराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे धुळे ७ मिलीमीटर, साक्री १२, शिंदखेडा १४, शिरपूर २६.